वाचन संस्कृतीचा प्रसार होऊन उत्तमोत्तम पुस्तके जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचावीत म्हणून चार वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभला असून महाराष्ट्राच्या विविध भागांप्रमाणेच गुजरात, दिल्ली तसेच सिल्वासा येथील मराठी वाचकांच्या घरी ग्रंथपेटीद्वारे मराठी पुस्तके गेली आहेत. आतापर्यंत या उपक्रमात प्रत्येकी शंभर पुस्तके असलेल्या ४७५ पेटय़ा विविध ठिकाणी वितरित करण्यात आल्या असून जागतिक पुस्तक दिनी बुधवारी पुण्यातील ५१ पेटी केसरी वाडय़ात दिली जाणार आहे.
मराठीतील वाङ्मयाची श्रीमंती जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचवून साहित्याचा परीघ रुंदाविण्यासाठी नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विनायक रानडे यांनी चार वर्षांपूर्वी प्रत्येकाने वाढदिवसाला एक पुस्तक विकत घेण्याचा उपक्रम सुरू केला. त्यातूनच पुढे मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारातील उत्तम शंभर पुस्तकांचा संच असलेल्या पेटीद्वारे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा जन्म झाला.
या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे दहा मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या ३५ वाचकांच्या समूहासाठी शंभर पुस्तकांची पेटी चार महिन्यांच्या कालावधीसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. चार महिन्यांनंतर पेटी बदलली जाते. सर्वसाधारणपणे प्रत्येक शहरात वितरित करण्यात आलेल्या पेटय़ांमध्ये वेगवेगळी पुस्तके असतात. या उपक्रमात सर्वात जास्त प्रतिसाद ठाणे परिसरात मिळाला. गेल्या अडीच वर्षांत येथे टीजेएसबी बँकेच्या सहकार्याने तब्बल ५५ पेटय़ा वितरित करण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणीही सहकारी बँका, उद्योजक, तसेच साहित्यप्रेमी नागरिकांच्या देणग्यांमुळे या उपक्रमाची कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहे. एका पेटीतील शंभर पुस्तकांसाठी २० हजार रुपये खर्च येतो. वाचनालय संस्कृतीला पूरक असणाऱ्या या उपक्रमात आतापर्यंत तब्बल ८५ लाखांची पुस्तके वाचकांच्या थेट दारी पोचली आहेत. सर्वसाधारण वाचकांप्रमाणेच ठाणे, नाशिक, येरवडा तसेच नागपूर येथील कारागृहांमध्ये तेथील बंदिवानांसाठी ग्रंथपेटय़ा वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी पाडय़ांवरही ग्रंथपेटय़ा पोचल्या आहेत. विदर्भात आनंदवनातही पुस्तकपेटी आहे.
आपणही सहभागी होऊ शकता
व्यक्तिगत स्वरूपात प्रत्येकजण वाढदिवसाला किमान एक पुस्तक खरेदी करता येईल, इतकी रक्कम देऊन या उपक्रमात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती समन्वयक विनायक रानडे यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. आपण राहतो त्या विभागात, संकुलात ग्रंथपेटीद्वारे विनामूल्य वाचनालय सुविधा उपलब्ध करून देता येईल. स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांचीही या उपक्रमाच्या प्रसारासाठी आवश्यकता आहे. संपर्क- विनायक रानडे- ९९२२२२५७७७.