मध्य रेल्वेमार्गावरील ४० लाख प्रवाशांना अधिक सुलभ आणि जलद मार्गाने तिकिटे मिळावीत, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विविध पर्याय अवलंबले असताना पश्चिम रेल्वेने मात्र तिकीट खिडक्यांवरच आपला भर जास्त ठेवला होता. मात्र आता पश्चिम रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएमचा पर्याय निवडला असून सर्व उपनगरीय स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांची संख्या साडेचारशेच्या वर नेण्याच्या दृष्टीने पावले उचलल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या मार्गावरील स्थानकांवर येत्या काही दिवसांतच १५७ नवीन एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या ३०० एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यापैकी काही यंत्रे बिघडली असल्याने ती बदलावी लागणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेमार्गावरील स्थानकांवर याआधी ३७५ एटीव्हीएम यंत्रे होती. त्यात आता मध्य रेल्वे २८८ नव्या यंत्रांची भर घालत आहे. मध्य रेल्वे एटीव्हीएम, जेटीबीएस असे विविध पर्याय उपलब्ध करून देत असताना पश्चिम रेल्वे मात्र तिकीट खिडक्यांवरच अवलंबून होती. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील तिकीट खिडक्यांची संख्या जास्त असल्याचा दावाही पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आला होता.
मात्र आता काळाची गरज लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनेही जास्तीतजास्त एटीव्हीएम यंत्रांवर भर देण्याचे ठरवले आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांवर सध्या ३०० एटीव्हीएम मशिन्स अस्तित्वात आहेत. त्यापैकी काही यंत्रे बिघडली आहेत. आता पश्चिम रेल्वे नवीन १५७ एटीव्हीएम यंत्रे बसवणार आहे.
ही यंत्रे अंधेरी, दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवली अशा प्रमुख स्थानकांसह इतरही स्थानकांवर बसवली जातील. उपनगरीय मार्गावरील प्रत्येक स्थानकात किमान चार यंत्रे असावीत, असा आमचा प्रयत्न असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल ४५ हजार प्रवासी दर दिवशी एटीव्हीएम यंत्रांवरून तिकिटे काढतात.
ही संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वे करणार आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होतील आणि प्रवाशांचाही वेळ वाचेल, असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.

Story img Loader