महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बहुसदस्यीय प्रभागांमधील आरक्षणांसाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. ३४ प्रभागांमधील नगरसेवकांच्या एकूण ६८ जागांपैकी तब्बल ४८ जागा कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी आरक्षित झाल्या असून २० जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. आरक्षणांच्या सोडतीबरोबर नव्या प्रभागरचनेचे प्रारूपही आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आज सकाळी ११ वाजता प्रभाग आरक्षणांची सोडत काढण्यात आली. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून आलेले अवर सचिव ध. मा. कानेड व कक्ष अधिकारी अतुल जाधव तसेच मनपाचे उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, नगररचनाकार विश्वनाथ दहे, प्रभारी उपायुक्त संजीव परसरामे आदी या प्रक्रियेत सहभागी झाले होते. सध्याचे नगरसवेक, माजी नगरसेवक व अन्य इच्छुक या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अवघ्या तासाभरात ही प्रक्रिया संपली. त्यानंतर लगेचच आरक्षणे व प्रारूप प्रभागरचनेचा तपशीलही मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला.   
या सोडतीनुसार अनुसूचित जातींसाठी ९ (५ महिला), इतर मागासवर्गीसांसाठी १८ (९ महिला), सर्वसाधरण वर्गासाठी ४० (२० महिला) आणि अनुसूचित जमातीसाठी १ याप्रमाणे आरक्षणे निश्चित झाली आहेत. यातील शहरात अनुसूचित जमातीसाठी एकच आरक्षण असून गेल्या वेळी ते महिलेसाठी होते, नियमानुसार या वेळी त्यासाठी सोडत न काढता ते या वर्गात साधारण म्हणून ठेवण्यात आले. सुरुवातीला अनुसूचित जातीच्या महिला, मग ओबीसी व राहिलेल्या प्रभागात सर्वसाधारण गटातील महिलांची २० आरक्षणांसाठी सोडत काढण्यात आली.
आरक्षणांची सोडत व प्रभागरचेनेचे प्रारूप यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मनपात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एक प्रवेशद्वार बंद ठेवून आवारात लोखंडी कठडय़ांचे अडथळे उभारण्यात आले होते.
– प्रत्येक प्रभागातील ब जागा सर्वसाधारण गटाच्या असून त्यातील १४ जागा या गटातील महिलांच्या आहेत. याशिवाय अ जागेवर ६ ठिकाणी (१-अ, ७-अ, १२-अ, २२-अ, २९-अ आणि ३०-अ)  सर्वसाधारण महिलांची आरक्षणे आली आहेत.
– प्रभाग १, ७, १२, २२, २९ आणि ३० अशा सहा ठिकाणी दोन्ही जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत, त्यातील अ जागा या गटातील महिलांच्या आहेत.
आरक्षणे ‘अ‍ॅट ए ग्लान्स’
अनुसूचित जाती- ९ (महिला: ५-अ, १५-अ, १६-अ, २६-अ ३४-अ. अन्य: ४-अ, १४-अ, २५-अ आणि २८-अ). ओबीसी- १८ (महिला: ८-अ, १०-अ, १८-अ, १९-अ, २०-अ, २४-अ, २७-अ, ३१-अ, ३२-अ. अन्य: २-अ, ६-अ, ९-अ, ११-अ, १३-अ, १७-अ, २१-अ, २३-अ, ३३-अ). अनुसूचित जमाती- १ (३-अ). सर्वसाधारण- ४० (महिला: १-अ, २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ७-ब, ९-ब, ११-ब, १२-अ, १३-ब, १४-ब, १७-ब, २१-ब, २२-अ, २३-ब, २५-ब, २८-ब, २९-अ, ३०-ए, २२-ब. अन्य: १-ब, ५-ब, ७-ब, ८-ब, १०-ब, १२-अ, १५-ब, १६-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २२-अ, २४-ब, २६-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब, ३१-ब, ३२-ब आणि ३४).
 महापौरपदाचे आरक्षण कोणते?
नोव्हेंबरच्या अखेरीस मनपाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या महापौरपदाचे आरक्षण मुंबईत पूर्वीच काढण्यात आले आहे. हे पद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. मात्र हे आरक्षण काढल्यानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षणाचे धोरण जाहीर केले. त्यामुळे महापौरपदाचे पूर्वीचे आरक्षण बदलेल अशी चर्चा आहे.