पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने २०१३-१०१४ या वर्षांसाठीचा ४८१ कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी मंजूर केला. मागील वर्षांतील तरतुदी पुन्हा नव्याने अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. मागील वर्षांत जाहीर केलेली अनेक कामे कागदावरच राहिली असताना त्याच घोषणा नव्याने केल्या आहेत.
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ४८१ कोटी १४ लाख रक्कम जमा अपेक्षित धरण्यात आले असून ४२८ कोटी खर्च अपेक्षित आहे. ५३ कोटी १३ लाख शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तरतुदीप्रमाणे अपेक्षित खर्च होऊ शकला नाही, अशी कबुली प्राधिकरणाने दिली आहे. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, शासनाने त्यासाठी स्थापन केलेली कंपनी संपुष्टात आणली व तेच काम प्राधिकरणाकडे सोपवले. यासंदर्भातील हस्तांतरण व अन्य कायदेशीर बाबींसाठी विलंब झाल्याने तरतूद तशीच राहिली. प्राधिकरणातील काही पेठांमध्ये रेडझोनमुळे बांधकाम परवानगी तसेच इतर विकासकामे करता आली नाहीत. भूखंडांचे व जमिनींचे वितरणही होऊ शकले नाही. त्यामुळेच प्राधिकरणाच्या अपेक्षित जमा व खर्चात विसंगती दिसते, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. याशिवाय, वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेला अद्याप मुहूर्त न लागल्याने नव्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश आहे.
प्राधिकरणाच्या जागांवर झालेली अतिक्रमणे कारवाई करून काढण्यात आली असून ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. व्यावसायिक हेतूने झालेली अनधिकृत बांधकामे प्राधान्याने पाडण्यात येतील. मोशी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल व त्यानंतर निविदा प्रक्रिया होईल, मगच प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल. प्राधिकरण व पालिका यांच्यात समन्वय साधून विकासकामे करण्याचे धोरण यापुढे राहणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Story img Loader