गरीब आदिवासी कुटुंबाला आयकर विभागाची नोटीस
पाच हजार रुपयेसुद्धा कधी एकत्रितपणे न पाहिलेल्या अंबरनाथ तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबाला आयकर विभागाने चक्क सव्वा पाच कोटी रुपयांचा व्यवहार केल्याप्रकरणी कर भरण्याची नोटीस बजावली असून या व्यवहारात फसवणुकीने त्यांची जमीन लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या सीमारेषेवरील वडवली (चिखलोली) गावात राहणाऱ्या काळूबाई वाघे आणि त्यांच्या कुटुंबीयांची तलावालगत असणारी २२ एकर जागा (सव्‍‌र्हे क्र. १३९ आणि १४०/७) काही दलालांनी परस्पर लाटल्याच्या आरोपास आयकर विभागाच्या या नोटिशीने पुष्टी मिळाली आहे. हक्काची जमीन फसवणुकीने हडप केल्याच्या दु:खावर आयकर विभागाच्या नोटिसीने मीठ चोळल्याची भावना वाघे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.  
चिखलोली गावातील वाघे कुटुंबीयांनी त्यांचे भाचे मोहन हरी मुकणे यांच्या नावे कुलमुखत्यार पत्र करून त्यामार्फत पाच एकर जागा विकली. मात्र प्रत्यक्षात दलालांनी त्यांच्या सर्व २२ एकर जागेचा व्यवहार झाल्याचे दाखविले. आदिवासींची जागा विकत घेताना शासनाने संबंधितांना जागेचा योग्य मोबदला देण्याची अट घातली आहे. मात्र या व्यवहारापोटी देय असलेले सव्वा पाच कोटी रुपये नियमाप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेत न भरता मुंबईतील एका सहकारी  बँकेत भरण्यात आले. जागेचा व्यवहार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोहन मुकणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेचच ती रक्कम परस्पर खात्यातून काढून घेण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. म्हणजे पैसे मिळाले नाहीच, उलट या व्यवहारात कर न भरल्याने आता आयकर विभागाच्या कारवाईस या कुटुंबास सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाची ही नोटीस ३० जानेवारी २०१२ रोजी देण्यात आली असून दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या या कुटुंबापुढे आता या नोटिशीचे काय करायचे असा प्रश्न पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा