महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना वर्षांच्या शेवटच्या दिवशी ५ कोटी ६३ लाख रुपये मालमत्ता कराची वसुली करण्यात आली, तर स्थानिक संस्था करातून ५ कोटी १५ लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर विभागाचे सभापती गिरीश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला कर विभागाची बैठक घेण्यात आली असून त्यात कर विभागाचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागात मालमत्ता कराची देयके वाटण्यात आली असून ३१ डिसेंबपर्यंत नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन करण्यात आले होते. वर्षांच्या शेवटी नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गांधीबाग झोनमधून १ कोटी १२ लाख, लक्ष्मीनगर झोनमधून १ कोटी ११ लाख, लकडगंज झोनमधून ६९ लाख, धरमपेठ ६६ लाख, हनुमाननगर ४८ लाख, आसीनगर ४२ लाख, मंगळवारी झोन ४२ लाख, नेहरूनगर ३२ लाख, धंतोली १८ आणि सतरंजीपुरा झोनमधून १६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. शहरातील १०८ केंद्रातून ही वसुली करण्यात आली आहे. खुल्या भूखंड संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले असून काही भूखंडाचा पंचनामा करण्यात आला आहे. अनेक भागातील खुल्या भागातील खुल्या भूखंडधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. ज्यांना डिमांड मिळाल्या नाही अशांनी महापालिकेच्या झोन कार्यालयातील कर विभागातून त्या घेऊन जाव्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सरकारी मालमत्ता करामधून ४ कोटी १३ लाख रुपये वसूल झाले आहे. आतापर्यंत ३१५ कोटीच्या डिमांड वाटण्यात आल्या असून वसुली मोठय़ा प्रमाणात झाली आहे.
स्थानिक संस्था करासंदर्भात माहिती देताना देशमुख यांनी सांगितले, आजपर्यंत २७ ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यापैकी ३१ ठिकाणी झडती घेण्यात आली असून ४ ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत स्थानिक संस्था करातून २४६ कोटी वसूल करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी जकात विभागातून ३५२. ९४ कोटींचा कर जमा करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थानिक संस्था करातून कमी वसुली झाली असली तरी येणाऱ्या दिवसात ही तूट भरून निघेल. डिसेंबर महिन्यात ४० कोटी रुपये वसूल होतील अशी अपेक्षा होती. स्थानिक संस्था करासंदर्भात वसुलीचे निर्देश देण्यात आले आहे.
अभ्यासाअंती निर्णय
नागरिकांवर अतिरिक्त कुठलाही कर लादू नये अशी भूमिका असल्यामुळे रेडिरेकनरचा निर्णय हा अभ्यासाअंती घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने ज्या पद्धतीने रेडिरेकनरची रचना केली आहे त्या पद्धतीने शहरात केली जाणार आहे, मात्र त्यासाठी शहरातील विविध भागाचा अभ्यास केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. बैठकीला दिव्या धुरडे, रश्मी फडणवीस, कर निर्धारक एस.एस. हस्तक आदी अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा