अशुभ मुहुर्तावर अर्ज दाखल करण्याचे सुतोवाच करणारे आम आदमी पक्षाचे नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार विजय पांढरे यांना काही तांत्रिक अडचणींमुळे गुरूवारी अर्ज दाखल करता आला नाही. यामुळे त्यांनाही शुभ मुहूर्त साधायचा आहे की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे माकपचे नाशिक मतदार संघातील उमेदवार अॅड. तानाजी जायभावे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार हेमंत वाघेरे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. काँग्रेस आघाडी, महायुती आणि मनसे या तीन पक्षांचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एकाच दिवशी अर्ज सादर करणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळसदृश्य स्थिती निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा व पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी गुरूवारी एक उमेदवारांनी तर दिंडोरी मतदार संघात चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही ज्योतीषांनी गुरूवार हा अशुभ मुहूर्त असल्याचे म्हटले होते. आपचे उमेदवार विजय पांढरे यांनी हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे सांगून या दिवशी अर्ज भरण्याची जय्यत तयारी केली. तथापि, अर्जाची छाननी करताना त्यात काही त्रुटी आढळून आल्या. त्याची पूर्तता करता करता सायंकाळ होऊन गेली. यामुळे त्यांना अर्ज सादर करता आला नाही. परंतु, याच पक्षांचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी अर्ज दाखल केला. माकपने आपल्या उमेदवारांचे अर्ज सादर करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले. बी. डी. भालेकर मैदानावरून त्र्यंबक नाका, सीबीएस, शालीमार, खडकाळी मार्गे फेरी काढून तिचा समारोप पुन्हा भालेकर मैदानावर झाला. जीपमधून माकपचे उमेदवार जायभावे व वाघेरे यांच्यासह डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे आदी नेत्यांनी मिरवणूक काढली. यावेळी लाल बावटा घेऊन शेकडो समर्थक सहभागी झाले होते. दिंडोरी मतदार संघात या दिवशी बसपाचे शरद माळी यांनीही अर्ज दाखल केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली.
नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्ताकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले आहे. त्याची परिणती, शुक्रवारच्या मुहूर्ताची अनेकांनी निवड करण्यात झाली. काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ व डॉ. भारती पवार, महायुतीचे हेमंत गोडसे व मनसेचे डॉ. प्रदीप पवार हे तिन्ही उमेदवार फेरी काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकाच दिवशी निघणाऱ्या फेऱ्यांमुळे मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होईल. तसेच या फेऱ्या परस्परांसमोर आल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पोलीस प्रशासनाने प्रत्येक पक्षाच्या फेरींसाठी स्वतंत्र मार्ग आणि वेगळी वेळ देऊन परवानगी दिली आहे. मुंबई येथे उफाळून आलेल्या मनसे व शिवसेनेतील वादाचे सावट या शक्ती प्रदर्शनावर राहणार आहे. या शिवाय, काँग्रेस आघाडीचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. या पाश्र्वभूमीवर, जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील गर्दीचे व्यवस्थापन, बंदोबस्त याबाबत आढावा घेतला.
या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या निवडक प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था बाहेर राहील. आतमध्ये स्थानिक पोलिसांची सुरक्षा राहणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मुहूर्त साधण्याच्या प्रयत्नात एकाचवेळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात येऊ शकतात. अशावेळी किती जणांना आतमध्ये प्रवेश द्यायचा, त्या स्थितीत नियोजन आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यांना केवळ पाच सदस्यांना आतमध्ये प्रवेश देण्याचा नियम निवडणूक यंत्रणेने ठेवला आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचा अर्ज भरताना निवडणूक यंत्रणा हा निकष कितपत पाळते, ते पाहणे औत्युक्याचे ठरेल.
तानाजी जायभावे अर्धा कोटीचे धनी
नाशिक लोकसभा मतदार संघातील डाव्या आघाडीचे उमेदवार अॅड. तानाजी जायभावे यांची एकूण मालमत्ता ५६ लाखाची असली तरी त्यांच्या डोक्यावर २२ लाखहून अधिकचे कर्ज आहे. त्यात अॅड. जायभावे यांच्याकडे २५ हजाराची रोकड असून चार बँकांमधील खात्यात १२ हजार रुपयांच्या आसपास शिल्लक आहे. एलआयसीमध्ये पाच लाख रुपयांचा विमा, त्र्यंबक विद्यामंदिर सहकारी सोसायटीत ११,२५० रुपयांची गुंतवणूक आहे. स्वत:कडे दहा ग्रॅम सोने असले तरी त्यांच्या पत्नीकडे ७० ग्रॅम असे एकूण दोन लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोने आहे. जायभावे कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही. अॅड. जायभावे यांच्याकडे पाच लाख ७७ हजार ३७८ रुपयांची चल मालमत्ता आहे. बेळगांव ढगा येथे १४ लाखाचा भूखंड,
नाशिक येथे तीन लाखाचा भूखंड, पत्नीच्या नावे खासगी समुहात भागिदारी, व्यापारी संकुलात पती व पत्नीची ५० टक्के भागिदारी अशी अचल संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अशी मालमत्ता बाळगणाऱ्या जायभावे यांच्यावर चार वेगवेगळ्या बँकांचे एकूण २२ लाख ५२ हजार १२० रुपयांचे कर्ज आहे.