तालुक्यातील भांडेवाडी येथील पाच शेतक-यांनी कुकडी प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू असून, त्याला यश येत नसल्याने पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयासमोर (सिंचन भवन) आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
भांडेवाडी येथील शिवदास किसन आगम, भानुदास तुळशीराम दळवी, निवृत्ती तुळशीराम दळवी व शंकर तुळशीराम दळवी या पाच शेतकऱ्यांची जमीन कुकडी कालव्यात गेली आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लाल फितीच्या कारभाराने या गरीब शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, अखेरचा पर्याय म्हणून आता या पाचजणांनी वरीलप्रमाणे इशारा दिला आहे. तसे पत्र त्यांनी या विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. तालुक्यात असे आणखी अनेक शेतकरी आहेत.
कुकडी डाव्या कालव्याचे खोदकाम करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या. त्या वेळी जमिनीचे पंचनामे करण्यात आले होते, मात्र ते फळबागा असल्या तरी दाखवण्यात आल्या नव्हत्या. काहींच्या जमिनी घेतल्या तरी त्या दाखवल्या नव्हत्या. जमिनी घेऊनही त्याचा पूर्ण मोबदला काहींना दिला नाही. वरील पाच शेतकरी कंटाळून पैसे मिळण्यासाठी कलम १८ अन्वये न्यायालयात गेले, मग भूसंपादन विभागाने लोकन्यायालयात तडजोड केली, या शेतकऱ्यांना पैसे देऊ असे न्यायालयास सांगितले. मात्र या विभागाने न्यायालयाचा अवमान करताना तब्बल ३ वर्षे झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.