कोपरगाव, राहाता तालुक्याच्या पाटपाण्याच्या प्रश्नावर हजारो शेतक-यांनी सोमवारी नगर-मनमाड रस्त्यावरील साईबाबा चौफुली येथे सुमारे साडेचार तास रास्ता रोको
गोदावरी कालवे सर्वपक्षीय पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हक्काचे अकरा टीएमसी पाणी मिळावे म्हणून केलेल्या रास्ता रोकोत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं या प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या साक्षीने पाणीप्रश्नी पुकारलेल्या लढय़ास सर्वानी मनापासून एकत्रित येऊन राजकारण न करता हा प्रश्न धसास लावण्यासाठी शासन दरबारी लढा द्यावा. जनतेवर अन्याय करणा-या सत्तारूढ आघाडी शासनास चहूबाजूने फटके मारा, गोदावरी कालव्यांना पाण्यापासून वंचित ठेवणा-या शासनाचा आम्ही निषेध करतो.
माजी मंत्री तथा सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे म्हणाले, सत्याग्रह मला नवीन नाही. कालव्याच्या लाभक्षेत्रात ४८ हजार शेतीचे क्षेत्र असून, त्यावर ७ लाख शेतकरी कुटुंबीयांचे जीवन अवलंबून आहे. २०११-१२ पर्यंत कालव्यांना रब्बीत दोन व उन्हाळ्यात तीन पाण्याचे आवर्तन मिळत गेले. त्यामुळे या भागातील शेतकरी कसाबसा जगला. आता मात्र पाणीच जर मिळाले नाही तर त्याचे पुढे काय करणार हा प्रश्नच आहे. दारणा, गंगापूर धरणांवरील वाढता बिगर सिंचन पाण्याचा भार आता सर्व धरणावर समप्रमाणात विभागल्याने तो ४० टक्के झाला आहे. समन्ययी वाटपाचा कायदा दारणेच्या मुळावर आहे असा आरोप त्यांनी केला.
आमदार अशोक काळे म्हणाले, इंडिया बुल्सला पाणी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देतेवेळी तो करारच रद्द करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसच्या आघाडी शासनाने शेतक-यांची सतत दिशाभूल करून हक्काच्या अकरा टीएमसी पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करून आमच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे म्हणाले, २०१४ मध्ये होणा-या कुंभमेळ्याच्या नावाखाली ऊर्ध्व गोदावरी खो-यातील धरणांचे पाणी आरक्षित करायचे तर दुसरीकडे धरणात पाणी असूनही ते कालव्यांना द्यायचे नाही अशा दुष्टचक्रात शेतक-यांना भरडण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. आमच्या मागण्याचा विचार न झाल्यास होणा-या गंभीर परिणामास शासनच जबाबदार राहील, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, सभापती मच्छिंद्र केकाण, भाजपचे सोमनाथ चांदगुडे, शेतकरी संघटनेचे भास्करराव बोरावके आदींची यावेळी भाषणे झाली. संजीवनीचे संचालक विश्वासराव महाले यांनी सूत्रसंचालन केले. कोसाकाचे उपाध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा