ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नर व मादी वाघाला कॉलर लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आणखी पाच बिबट व तीन वाघांना मार्च २०१५ पर्यंत ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या डेहराडूनच्या संयुक्त विद्यमाने हा पाच वर्षांंचा कार्यक्रम राबविला जात आहे.
वन समृध्दीने नटलेल्या या जिल्हय़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व परिसरातील जंगलात ११०च्यावर पट्टेदार वाघ आहेत. तेवढेच बिबटदेखील आहेत. येथील मानव व वन्यजीव प्राण्यांमधील संघर्ष बघता बिबट व वाघाला मायक्रोचिप लावण्यात आली आहे. परंतु मायक्रोचिप निघून गेली की वाघ नेमको कुठे आहे,  हे कळत नसल्याने वन विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संवर्ध प्राधिकरण व वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने पाच वर्षांंचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे.
या कार्यक्रमानुसार वाघ व बिबटय़ांना ‘रेडिओ कॉलर’ लावून अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ताडोबात १७ व १९ ऑक्टोबर रोजी नर व मादी वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला. आता पुन्हा पाच बिबट व तीन वाघांना मार्च २०१५ पर्यंत रेडिओ कॉलर लावली जाणार आहे. यासाठी वाईल्ड लाईफ इस्टिटय़ूट ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल, डॉ.पराग निगम, क्षेत्र संचालक डॉ.जी.पी. गरड, ताडोबा कोरचे कळसकर, मधुरा, निलांजन आणि अनिल ही तज्ज्ञ मंडळी ताडोबाच्या जंगलात नियमित अभ्यास करीत आहेत. यापूर्वी बिबट व माळढोक या दोघांना कॉलर लावण्यात आली आहे.
मात्र वाघाला कॉलर लावण्याचा ताडोबातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. कॉलर लावल्यामुळे वाघांच्या एकूणच दिनक्रमावर चोवीस तास लक्ष ठेवणे सहज शक्य झाले आहे.
 नर व मादी वाघाला लावलेले कॉलर हे क्षेत्र संचालकांच्या कार्यालयातील संगणकाशी जुळलेले आहे. त्यामुळे वाघाने दिवसभरात केलेली शिकार, त्याच्या हालचाली तसेच त्याच्या निवासस्थानाची माहिती मिळणे सहज शक्य झाले आहे. वाघ शिकार कसा करतो, शिकारीच्या दिवसातील अंतर याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. कॉलर लावलेल्या दोन्ही वाघांची प्रकृती ठीक असून ताडोबात मुक्त संचार करीत आहे. वाघांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच राज्याच्या वन विभागाने संयुक्तपणे प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दोन्ही वाघांना कॉलर लावण्यात आलेले आहे. येत्या काळात अन्य काही वाघांना सुध्दा अशाच पध्दतीने कॉलर लावले जाणार आहेत.
दरम्यान, ज्या पाच बिबटय़ांना कॉलर लावली जाणार आहे त्यातील तीन बफर झोन तर दोन कोर झोनमधील आहेत. मोहुर्ली, कोळसा व ताडोबा या तिन्ही वनपरिक्षेत्रातील वाघ व बिबटय़ाला ही कॉलर लावली जाणार असून बिबटय़ांची निवड करण्यासाठी वाईल्ड लाईफ इस्टिटय़ूट ऑफ डेहराडूनचे अभ्यासक जंगलात भ्रमंती करीत आहेत. यातील दोन बिबटय़ांची निवड केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अन्य तीन बिबटय़ांची निवडही लवकरच केली जाणार आहे. बिबट हा अतिशय चपळ वन्यप्राणी असल्याने व त्याला पकडणे अतिशय कठीण असल्याने या अभ्यासकांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
साधारणत: येत्या पंधरा दिवसात किमान दोन बिबटय़ांना कॉलर लावली जाईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली. सध्यातरी वाईल्ड लाईफ इस्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या डेहराडूनचे अभ्यासक ताडोबात बिबटय़ाला बेशुध्द करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करीत आहेत. वाघासोबतच या जिल्हय़ात बिबट, माळढोक आणि गवा या तीन वन्यप्राण्यांवर आतापर्यंत ‘‘रेडिओ कॉलर’चा यशस्वी प्रयोग झाला आहे.

Story img Loader