संपूर्ण जिल्हा दुष्काळाचे चटके सहन करीत असताना मागील आठवडय़ात बेमोसमी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने पिकांचे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. एकटय़ा रावेर तालुक्यात नुकसानीचा आकडा आठ कोटीपर्यंत गेला आहे. टंचाईशी कसा सामना करावा ही चिंता असलेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानीमुळे कंबरडे मोडले असून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त भागात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी लावण्याची मागणी केली आहे.
बेमोसमी पाऊस साधारणपणे एखाद्या दिवसापुरता मर्यादित असतो. परंतु मागील आठवडय़ातील पाऊस दोन-तीन दिवस टिकल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे गोविंद भोळे या शेतकऱ्याने नमूद केले. त्यातच गारपिटीचा पिकांना अधिक फटका बसला. केळी, गहू, हरभरा, मका, अशी सर्व पिके भुईसपाट झाली. टंचाईच्या परिस्थितीत उत्पन्न येण्याची जी थोडीफार आशा होती, तीही उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी खा. हरिभाऊ जावळे यांच्यासह गारपीटग्रस्त रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. सावदा तालुक्यातील चिनावल, वाघोदा, निंभोरा, कोचुर आदी भागातील नुकसानीची तीव्रता पाहता तिथे ५० टक्यांपेक्षा कमी आणेवारी लावण्याची सूचना खडसे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या आसमानी संकटामुळे जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या वतीने या भागात पाहणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी १३ हजार हेक्टरपैकी सात हजार हेक्टरमधील पिके भुईसपाट झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. रावेर परिसराचे आ. शिरीष चौधरी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत मिळावी, शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली थांबवावी, वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी केली आहे.
जळगावमध्ये पाऊस व गारपिटीमुळे ५० कोटीचे नुकसान
संपूर्ण जिल्हा दुष्काळाचे चटके सहन करीत असताना मागील आठवडय़ात बेमोसमी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने पिकांचे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. एकटय़ा रावेर तालुक्यात नुकसानीचा आकडा आठ कोटीपर्यंत गेला आहे. टंचाईशी कसा सामना करावा ही चिंता असलेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानीमुळे कंबरडे मोडले असून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त भागात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी लावण्याची मागणी केली आहे.
First published on: 20-02-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 crores of loss because of rain and winter strock in jalgaon