कोल्हापूर जिल्ह्य़ातील करवीर तालुक्यातील वडकशिवालेचे सुपुत्र डॉ. सचिन पांडुरंग पाटील यांना अल्झायमर्सवरील संशोधनासाठी अल्झायमर्स असोसिएशन या अमेरिकेतील संशोधन संस्थेने ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. जगातील २० संशोधकांना प्रत्येकी ५० लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली असून यातील डॉ.पाटील हे सर्वात कमी वयाचे आणि एकमेव भारतीय संशोधक आहेत.
डॉ.पाटील यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण वडकशिवाले येथे झाले. यानंतर आजरा व्यंकटराव हायस्कूलमध्ये त्यांनी आठवी ते दहावी व नंतर आजरा महाविद्यालयातून बारावी शास्त्र परीक्षा ते उत्तीर्ण झाले. दहावी व बारावीला ते आजरा तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांनी तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी त्वरित नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक्स येथे नोकरीला सुरुवात केली. परंतु डॉ.सचिन यांना त्यांच्यातील संशोधन वृत्ती स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी करतानाच अभ्यास करत त्यांनी गेटची परीक्षा दिली व त्यामध्ये त्यांना ९०.२२ टक्के गुण मिळाले. यानंतर त्यांनी लगेचच मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथून एम.टेक.पदवी मिळविली. याकामी त्यांना कोल्हापूर जिल्ह्य़ाचेच सुपुत्र व इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रोफेसर जी.डी.यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या उत्प्रेरक विषयावरील शोधनिबंधाला भारतीय स्तरावरील दुसरे पारितोषिक मिळाले. अमेरिकेमध्ये संशोधनासाठी जाण्यासाठी आवश्यक असणारी जीआरई ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला. सन २००२ ते २००७ या पाच वर्षांमध्ये पीएच.डी. करताना त्यांचा पीएच.डी.चा सर्व खर्च विद्यापीठाने केला व दरमहा १ लाख रुपये विद्यावेतनही दिले.
पीएच.डी.च्या शेवटच्या वर्षीच डॉ.पाटील यांना आऊटस्टॅडिंग ग्रॅज्युएट स्टुडन्ट म्हणून पुरस्कार मिळाला.अल्झायमरबाबतच्या संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारून केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर हेच संशोधन पुढे सुरू ठेवण्यासाठी मिशिगन विद्यापीठाने त्यांना ३ वर्षे विशेष मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. २०१० साली त्यांनी वायडनर विद्यापीठामध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर म्हणून रितसर नोकरी सुरू केली.
याच दरम्यान अल्झायमर्स असोसिएशनने संशोधन शिष्यवृत्ती देण्यासाठी जगभरातून संधोधकांकडूनअर्ज मागविले होते. जगातून १ हजार संशोधकांनी यासाठी अर्ज केले होते. यातील केवळ २० जणांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. मेंदूतील विशिष्ट ठिकाणच्याच पेशी मृत का होतात आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन सुरू असून त्यासाठी डॉ.पाटील यांनी फिलाडेल्फिया शहराशेजारील सॉर्थमोर या गावी स्वतची प्रयोगशाळाही उभारली आहे. २०१५ पर्यंत हे संशोधन सुरू राहणार असून ही शिष्यवृत्ती मिळालेले सर्वात कमी वयाचे भारतीय असल्याचा मान डॉ.पाटील यांच्याकडे जात आहे.
घरची परिस्थिती बेताची तरीही…
डॉ.सचिन पाटील यांचे वडील पांडुरंग पाटील हे वीज खात्यामध्ये क्लार्क म्हणून सेवेत होते. सध्या ते कोल्हापुरातच सेवानिवृत्तीचे जीवन व्यतित करत आहेत. तीन बहिणींचे शिक्षण, विवाह या सगळ्यामध्ये अतिशय बेताची असलेली परिस्थिती परंतु याच परिस्थितीमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली व अपार कष्टाच्या जोरावर आपण हे यश मिळवू शकलो असे मनोगत डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी, तसेच मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थीही परिस्थिती नसतानाही अशा पध्दतीचे यश मिळवू शकतात हे दाखवून दिल्याचे आपल्याला समाधान असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा