रामदास आठवले यांची घोषणा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे ५० टक्के तिकिटे दलितेतर उमेदवरांना देणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. लोकसभेसाठी ३-४ तर विधासनभेसाठी ३० ते ३४ जागा युतीकडे मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या २००९मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दलित उमेदवारांनी घेतलेल्या मोठय़ा प्रमाणावरील मतांमुळेच मुळेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होऊन भाजप वा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षाशिवाय यंदा भाजप-शिवसेना युती यंदा सत्तेत येऊ शकणार नाही. दलितांची १५ ते १८ हजार किंबहुना मोठय़ा प्रमाणावर मते युतीला मिळणार आहेत. त्यामुळे तातडीने जागा वाटपाची चर्चा करून एक- दोन महिन्यात वाटप निश्चित व्हावयास हवे, असा प्रयत्न असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाने जागा वाटपासाच्या चर्चेसाठी राज्यात ६१ जागांची यादी तयार केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जेथून निवडून आला, अशाच जागा रिपब्लिकन पक्षाला हव्या आहेत. विशेषत: काही अपक्षांशी रिपाइं चर्चा करीत असून त्यांनी रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आमचा प्रयत्न आहे. सातारा येथून उदयनराजे भोसले यांनी रिपाइंकडून लोकसभेसाठी तर बडनेरा येथील अपक्ष आमदार रवि राणा यांच्यापुढेही प्रस्ताव ठेवला जाणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
लोकसभेसाठी रामटेक, लातूर, पुणे, दक्षिण मध्य मुंबई, कल्याण व सातारा या जागा लोकसभेसाठी मागणार असून अकोला मागण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. राज्यातील कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबत आठवले यांनी बोलायचे टाळले. कुणाला कुठून उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल. शिर्डीचा धसका मुळीच घेतला नसून धसका देण्यासाठी मोकळे रहायला हवे, असे ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे पन्नास टक्के उमेदवार हे दलितेतर असतील. मुळात विरोध कुण्या जातीला न करता प्रवृत्तीला करायला हवा, अशी ठाम भूमिका प्रथमपासूनच असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. मनसेला महायुतीत घेण्यास विरोध होता. मात्र, दोन भाऊ एकत्र येणार असतील तर त्यास हरकत नाही. त्यासाठी भाजपने जरूर प्रयत्न करावा, रिपाइं प्रयत्न करणार नाही. मनसेला जी मते मिळाली ती भाजप वा शिवसेनेची होती. मनसे स्वतंत्र लढली तर तिला मिळणारी मते ही काँग्रेस व राष्ट्रवादीची असतील, जनता दलाने निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. प्रचारप्रमुख कुणाला करायचे हा भाजपचा अधिकार आहे, मात्र मित्र पक्ष दूर जाणार नाहीत, याचीच काळजी घ्यायला हवी, असे विविध प्रश्नांच्या उत्तरात आठवले म्हणाले. १० नोव्हेंबरला रिपाइंचा कस्तुरचंद पार्कवर विदर्भव्यापी मेळावा होणार आहे. स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे रणशिंग त्यावेळी फुंकले जाईल. मोहन पटेल, भूपेश थूलकर, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे व इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
माओवाद्यांच्या मागणीस रिपाइंचा पाठिंबा असल्याचे सांगत खरे आंबेडकरवादी हे नक्षलवादी होऊ शकत नाहीत, अशी भूमिका रामदास आठवले यांनी स्पष्ट केली. नक्षलवादी ज्या मार्गाने जात आहेत त्याने काहीच साध्य होणारे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत विचारांविरुद्ध नक्षलवादी चळवळ आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे योग्यच आहे, पण नक्षलवाद्यांच्या मार्गाने नव्हे, हे आंबेडकरवाद्यांनी लक्षात घेऊन जागरुक रहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा