आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकेला सावरण्यासाठी आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज मालमत्ता कर वसुलीच्या फाटलेल्या झोळीला सवलतीचे ठिगळ लावले. थकबाकीदारांच्या दंडाच्या रकमेत ३१ मार्च २०१३ पर्यंत ५० टक्के सवलत जाहीर करून त्यांनी मालमत्ताधारकांनी आता तरी थकीत कर जमा करावा, असे आवाहन केले.
मनपाच्या या विभागाची थकबाकी म्हणजे शब्दश: कोटीच्या कोटी उड्डाणे आहेत. आयुक्त कुलकर्णी यांनीच त्याचा पाढा आज पत्रकारांसमोर वाचला. उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी यावेळी उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षांअखेर (एप्रिल २०१२ पर्यंत) मनपाची फक्त मालमत्ता कराची थकबाकी ६९ कोटी १७ लाख व दंडाची रक्कम २० कोटी १३ लाख रूपये आहे. सर्व मिळून थकबाकी ८९ कोटी ५० लाख आहे. त्यापैकी दंडाचे ९७ लाख व मालमत्ता कराचे ६ कोटी ३२ लाख असे फक्त ७ कोटी २० लाख रूपये मनपाला आतापर्यंत वसूल करता आले. म्हणजे ८२ कोटी २० लाख रूपये निव्वळ थकबाकी आहे.
चालू आर्थिक वर्षांची (एप्रिल २०१२ ते मार्च २०१३) मनपाची मालमत्ता कराची मागणी ३३ कोटी ५४ लाख रूपये आहे. आता नव्या कायद्यानुसार दरमहा २ टक्के दंड लागू होत असल्याने दंडाच्या रकमेची मागणी १८ कोटी १४ लाख रूपये आहे. म्हणजे एकूण मागणी ५१ कोटी ६९ लाख रूपये आहे. आयुक्तांनी वसुली विभागाला आर्थिक वर्षांच्या सुरूवातीलाच १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, या विभागाला फक्त १२ कोटी ८३ लाख रूपये म्हणजे ५० टक्केही उद्दिष्ट गाठता आले नाही. थकबाकी व चालू आर्थिक वर्षांची मागणी मिळून मनपाची तब्बल १२३ कोटी ४ लाख रूपयांची थकबाकी असून त्यातील मनपाने फक्त २० कोटी १३ लाख रूपये वसूल केले आहेत.
‘काय करणार, नागरिक थकबाकी जमा करतच नाही,’ असे हताश उद्गार आयुक्तांनी काढले व नागरिकांनी कर जमा करण्यास प्रवृत्त करावे म्हणून दंडाच्या रकमेत ५० टक्के सवलत जाहीर केली. १ फेब्रुवारीपासून कर विभागाची सर्व कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, असे ते म्हणाले. करआकारणीबाबत काहीही तक्रार असेल तर संबंधितांनी त्याचे त्वरित निराकरण करावे अशा सूचना सर्व प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, सर्व मिळकतधारकांची बिले अदा केली आहेत. मागील वर्षी देण्यात आलेली सवलत बिलात दाखवण्यात आली नसेल तर त्यातही संबंधित विभागाकडून त्वरित सुधारणा करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील करणे, लिलाव पुकारणे असे बरेच अधिकार मनपाला आहेत, ३१ मार्चनंतर त्याचा वापर करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे, मात्र नागरिकांनी मनपावर तशी वेळ येऊ देऊ नये, वेळेवर कर जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले. शहरात ९१ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यांच्यापैकी २ हजार ३८८ जणांकडे ५० हजार रूपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यांना नोटिसा वगैरे दिलेल्या आहेत. आता त्यांनीही सवलतीचा लाभ घेऊन त्वरित थकबाकी जमा करावी, अन्यथा ३१ मार्चनंतरच्या कारवाईला सर्वप्रथम त्यांनाच सामोरे जावे लागणार आहे, असा इशाराही आयुक्तांनी दिला. या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी मनपाचे एक स्वतंत्र पथक तयार केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
घरपट्टीच्या दंडात ५० टक्के सूट
आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकेला सावरण्यासाठी आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज मालमत्ता कर वसुलीच्या फाटलेल्या झोळीला सवलतीचे ठिगळ लावले.
First published on: 25-01-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 rebate on property tax fine