वीसपेक्षा कमी पट असणा-या शाळा बंद करण्याच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ४३७ शाळांचा समावेश आहे. यापैकी पटसंख्येअभावी ५० टक्के शाळा बंद होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार पी. बी.पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची पर्यायी शाळेत व्यवस्था होऊ शकेल अशा शाळांच्या बाबतीत ही कारवाई करण्यात येणार आहे. डोंगरी आणि दुर्गम भागातील शाळा संख्येअभावी बंद होणार नाहीत. अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांना जिल्हय़ाबाहेर जावे लागणार नाही. जिल्हय़ातीलच रिक्त पदांवर या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत गटशिक्षण अधिका-यांकडून शंभर टक्के पटपडताळणीचा अहवाल आल्यानंतरच याचा अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक भरतीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बचतगट महोत्सव
महिलांच्या कार्यकुशलतेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बचतगट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
९९९ ग्रामपंचायती निर्मलग्राम
कोल्हापूर जिल्हय़ातील ९९९ ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली. संपूर्ण जिल्हा निर्मलग्राम करण्याच्या कामासाठी जिल्हय़ातील महाविद्यालयांच्या एनएसएस शिबिरांच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे.