कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे चौपट पाऊस झाला आहे. परिणामी गेल्यावर्षी ३० जुलैला ५० टक्के भरलेले कोयना धरण या खेपेस तब्बल एक महिना अगोदर भरले आहे. समाधानकारक पावसामुळे खरिपाच्या पेरण्या उत्साहात पार पडत असून, कोयना धरण तुलनेत अगदीच लवकर भरण्याची दाट शक्यता आहे.
गतवर्षी ४ सप्टेंबरला कोयना धरण क्षमतेने भरल्याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटाने उचलून कोयना नदी पात्रात ९ हजार ४८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. यंदामात्र प्राप्त परिस्थिती पहाता गतवर्षीच्या तुलनेत किमान १ महिना अगोदर म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापूर्वीच कोयना जलाशय शिगोशिग भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच कोयनेच्या दुसऱ्या आणि ऐतिहासिक लेक टॅपिंगच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रासह शेजारच्या चार राज्यांना विजेच्या लखलखाट देणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती अखंड आणि पूर्ण क्षमतेने कायम राहिल असे तूर्तास दिसून येत आहे.
गतवर्षी ५ जूनला पावसाने जोरदार हजेरी लावून नंतर सलग २० दिवस दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या पुरत्या धोक्यात आल्या होत्या. याखेपेस मात्र, पावसाने पहिल्या सत्रात जोरदार हजेरी लावल्याने गतवर्षीच्या तुलनेत बक्कळ असा चौपट पाऊस कोसळल्याची समाधानकारक आकडेवारी असून, दरम्यान सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातही कमी, अधिक प्रमाणात पाऊस कोसळल्याने दुष्काळाच्या चर्चेला आजमितीला तरी विश्रांती मिळून प्रशासनाचा दुष्काळ निवारण्याचा ताण कमी झाला आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी कंसात एकूण पाऊस- सातारा ४.८(२४८.६), जावली ५.२(५१९.७), कोरेगाव १.६(१५६.१), फलटण शून्य (९९.६), माण शून्य (६८.२), खटाव ०.१(९७.९), वाई ०.१ (२८१.५), महाबळेश्वर १०.८ (६१२.६) तर खंडाळा तालुक्यात शुन्य १७६.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना शिवसागर अर्थात कोयना धरणात चालू हंगामात सुमारे २३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा ५२.४४ टीएमसी म्हणजेच जवळपास ५० टक्के असून, गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा २७.७१ टीएमसी म्हणजेच २६.२५ टक्के  असा चिंताजनक होता. धरणक्षेत्रात गतवर्षी आजमितीला सरासरी ४१७.३३ मि. मी., यंदा हाच पाऊस १५१४.२५ मि. मी. म्हणजेच ७२.४३ टक्के जादा पाऊस झाला आहे. धरणाखालील कराड तालुक्यात गतवर्षी आजअखेर ५९ मि. मी. पाऊस झाला होता. सध्या सरासरी १६६ मि. मी. पाऊस नोंदला गेला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो ६५.४६ टक्क्यांनी जादा आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रातील नवजा व हेळवाक वगळता गतवर्षी आजमितीला सरासरी १०२ मि. मी. पावसाची नोंद आहे.  सध्या हाच पाऊस २७९.९ मि. मी. म्हणजेच गतवर्षीपेक्षा ६३.५५ टक्क्याने जादा कोसळला आहे. यंदा कोयना धरणक्षेत्रातील प्रतापगड विभागात सर्वाधिक १५५० मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी नवजा विभागात आजअखेर सर्वाधिक ५५० मि. मी. पावसाची नोंद झाली होती. चालू हंगामात धरणक्षेत्रातील महाबळेश्वर विभागात १५३० व कोयनानगर विभागात १४७१ मि. मी., नवजा विभागात १५०६, पाऊस नोंदला गेला आहे. हा सरासरी पाऊस १५१४.२५ मि. मी. असून, गतवर्षी हाच सरासरी पाऊस ४१७.३३ मि. मी. नोंदला गेला आहे. याखेपेस आजअखेर ७२.४३ टक्के जादा पाऊस झाला आहे. गतवर्षी महाबळेश्वर विभागात ३५६ तर, कोयनानगर विभागात ३४६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज दिवसभरात कोयना धरणक्षेत्रात सरासरी १६.३३ मि.मी.पाऊस कोसळला आहे. तर, आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पाटण तालुक्यात २ तर कराड तालुक्यात ०.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात या दोन्ही तालुक्यात पावसाची उघडझाप राहिल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा