महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत एकूण ३०१ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आल्याचा शिक्षण मंडळाचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र पाचशेवर कॉपीबहाद्दर पकडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बारावीच्या परीक्षेत सर्वात जास्त गोंदियात १०९ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत कॉपीमध्ये विदर्भाचे प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे यावर्षी कमीतकमी आकडेवाडी राज्य मंडळाला दाखवायची असल्याने त्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना, असे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २ मार्चपासून सुरू झाली आहे. बारावीचे पाच ते सहा पेपर आणि दहावीचे आठ पेपर शिल्लक आहेत. त्यामुळे कॉपीबहाद्दरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विविध जिल्ह्य़ात भरारी पथके पाठविण्यात आली आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कॉपीचे मोठे प्रमाण असल्यामुळे त्या भागात भरारी पथकांशिवाय बैठे पथकही पाठविण्यात आले होते. यावर्षी कॉपीबाबत मंडळाने ग्रामीण भागातील मुख्याध्यापक व केंद्राधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ग्रामीण भागात  कॉपीचे काही प्रकार उघडकीस आले. बारावी आणि दहावीत जी केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती त्या केंद्रांवर कडक बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत.
गोंदिया आणि भंडाऱ्यात सर्वात जास्त कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ात मंडळाचे चार सदस्य असून त्यांच्याच जिल्ह्य़ात कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीचा निकाल बघता सर्वात जास्त निकाल गोंदियाचा आणि त्या खालोखाल भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ाचा असतो. बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्य़ात सर्वात जास्त म्हणजे १०९ विद्यार्थी कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. भंडाऱ्यात २०, चंद्रपूरला ३६, नागपूरमध्ये २०, वर्धा १७, गडचिरोली १६ विद्यार्थी पकडण्यात आले आहेत. दहावीचा मराठीचा एकमेव पेपर झाला असून त्यात ८३ विद्यार्थी कॉपी करताना पकडण्यात आले.
 या संदर्भात शिक्षण मंडळाचे सचिव पारधी म्हणाले, गोंदिया जिल्हा सोडला तर अन्य जिल्ह्य़ात गेल्या वर्षांच्या तुलनेत कॉपीचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांंमध्ये जागृती आली असून आणि मंडळाने कॉपी संदर्भात कडक धोरण केले असल्यामुळे कॉपीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉपीची प्रकरणे रोखण्यासाठी मंडळाने व्यवस्था केली होती. त्याउपरही काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्य़ात आज सर्वात जास्त पथके पाठविण्यात आली होती. उद्या दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्यामुळे मंडळाने प्रत्येक संवेदशनशील केंद्रावर लक्ष केंद्रित केले असून कॉपी करताना विद्यार्थी पकडण्यात आले तर त्यानंतरच्या कुठल्याच पेपरला विद्यार्थ्यांला बसता येणार नसल्याचे मंडळाने कळविले आहे. शिवाय, कॉपी प्रकरणात शिक्षक जर सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा