दुष्काळ निवारणीसाठीचा राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च एकटय़ा नगर जिल्ह्य़ातच झाला आहे. सर्वात जास्त छावण्या, सर्वात जास्त टँकर व रोजगार हमीच्या कामावर सर्वाधिक मजूर अशी जिल्ह्य़ाची ओळख राज्यात निर्माण झाली आहे.
यात जनावरांच्या छावण्यांसाठीचा खर्च सर्वाधिक आहे. तब्बल ४०१ छावण्यांमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त लहानमोठी जनावरे आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासन रोज १ कोटी ७७ लाख ८० हजार रूपये खर्च करते आहे. आतापर्यंत फक्त छावण्यांसाठीच म्हणून १८० कोटी रूपये खर्च झाले आहेत. स्वयंसेवी संस्था, संघटना, तसेच मंडळे या छावण्या चालवत असून त्यासाठी त्यांना प्रत्येक मोठा जनावरासाठी ७५ रूपये व लहान जनावरासाठी ३५ रूपये अनुदान दिले जाते. एका छावणीत किमान २५० जनावरे असतात. त्यांचा चारापाणी हे सर्व छावणीचालकाने पहायचे असते.
जिल्ह्य़ातील तब्बल ११ लाख लोकसंख्येला प्रशासन पिण्याचे पाणी पुरवत आहे. ४७३ गावे व २ हजार ४८ वाडय़ावस्त्यांमधून ही तहानलेली लोकसंख्या पसरली आहे. ६६२ टँकर या गावांना पाणी देण्यासाठी रोज सुमारे २ हजार फेऱ्या मारत असतात. एका टँकरचा खर्च दिवसाला किमान ४ हजार रूपये असतो. त्यानुसार प्रशासनाचे टँकरसाठी रोज २७ लाख रूपये खर्च होत आहेत. आतापर्यंत टँकरसाठी ३२ कोटी ८७ लाख रूपये खर्च झाले आहेत. एकूण ५ खासगी संस्थांना टँकरचे काम देण्यात आले असून त्यांच्या फेऱ्या वगैरेची व्यवस्थित नोंद पाणी घेतले त्या ठिकाणी व पाणी पोहचवले त्या ठिकाणी अशी दोनवेळा घेतली जाते. त्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे.
छावण्या मोठय़ा प्रमाणात सुरू नव्हत्या त्यावेळी प्रशासनाने गावनिहाय चारा डेपो सुरू केले होते. या चाराडेपोंमधील चाऱ्यासाठी प्रशासनाने ९० कोटी ९२ लाख रूपये खर्च केले. शेतक-यांनी डेपोत येऊन चारा घेऊन जायचा होता. त्यात वाद निर्माण होऊ लागले, चाऱ्याची वाहतूक तसेच वितरण यातही अनेक अडचणी तयार झाल्या. दरम्यानच्या काळात छावण्यांची मागणी वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने छावण्यांना प्राधान्य देत चारा डेपो बंद करून टाकले. छावणीतच चारा मिळण्याची व्यवस्था झाल्यामुळे डेपो बंद झाले तरी तक्रारी वगैरे झाल्या नाहीत.
याशिवाय रोजगार हमी योजनेवर जिल्ह्य़ात आतापर्यंत सुमारे २०० कोटी रूपये खर्च झाले आहेत. मजुरांचे वेतन, यंत्राच्या सहाय्याने केलेले काम तसेच आस्थापनेवरचा खर्च याचा यात समावेश आहे. सध्या रोजगार हमीच्या कामावर जिल्ह्य़ात २१ हजार मजूर काम करत आहेत. जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातच जास्त टंचाई असल्यामुळे मजुरांची संख्याही याच भागात जास्त आहे. त्यातुलनेत उत्तरेतील तालक्यात मात्र चांगली परिस्थिती आहे. तरीही संगमनेर, अकोले, कोपरगाव या तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई असून तिथे टँकर सुरू आहेत.

Story img Loader