मुंबईत होणाऱ्या मोदींच्या विशाल सभेला उपस्थित राहण्यासाठी अकोल्यातील ५०० चहा विक्रेत्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती १५ डिसेंबरला होणार असून त्यानिमित्त होणाऱ्या मॅराथॉन दौडीत २५ हजार युवक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील व मोदींची निर्धार यात्रा भाजपा सफल करेल, असे ते म्हणाले. मुंबई येथे मोदींच्या सभेला हजर राहता यावे, यासाठी महाराष्ट्रातून २० रेल्वे गाडय़ांचे आगावू आरक्षण करण्यात आले आहे. मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांचे हजारो हितचिंतक तेथे जमणार आहेत. अकोल्यातून ५०० चहा विक्रेते मुंबई सभेला जाणार आहेत. काँग्रेसी नेत्यांनी विविध ठिकाणच्या प्रचारात चहा विकणारा, असा मोदींचा उल्लेख करून त्यांचा उपहास केला, पण ही बाब काँग्रेसवर उलटविण्यासाठी भाजपाने शक्कल लढवून चहा विक्रेत्यांना मुंबईत आमंत्रित करून एक प्रकारे मोदींना प्रत्येकाची सहानुभूती मिळेल, असे प्रयत्न चालविले आहेत. मुंबईतील मोदींच्या सभेत त्यांना भेट म्हणून निधी देण्याची संकल्पना असून भाजपा नेत्यांनी संकलनाचे काम सुरू केले आहे. सरचिटणीस किशोर मांगटे पाटील हे निधी संकलन समितीचे प्रमुख, तर मॅराथॉन स्पध्रेचे प्रमुख दीपक मायी आहेत.

Story img Loader