अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथे एम.एम.पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७८४ नेत्र रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी ५०८ रुग्णांवर मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया केल्या.
चार दिवस चाललेल्या या नेत्रशिबिराचा समारोप बुधवारी विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना प्रा. पुरके व पटेल चॉरिटेबल ट्रस्टचे प्रमुख बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप करण्यात आले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख आणि त्यांच्या २५ सहकाऱ्यांनी या नेत्र शिबिरात रुग्णांची तपासणी केली. सोलापूरसह उस्मानाबाद, लातूर, गुलबर्गा, विजापूर, बिदर आदी भागातून आलेल्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदूचा दोष आढळलेल्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी डॉ. लहाने व त्यांचे सहकारी अथकपणे एकेका दिवशी तब्बल १८ तास रुग्णसेवा करीत होते. शिबिराच्या समारोपाप्रसंगी डॉ. लहाने यांनी यापुढे दरवर्षी मोतीिबदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेण्यासाठी आपला सक्रिय सहभाग राहील अशी ग्वाही दिली. तसेच, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन केले. विधानसभेचे उपसभापती प्रा. पुरके यांनी आपल्या भाषणात डॉ. लहाने व डॉ. पारेख यांच्या सेवाकार्याला अभिवादन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी बिपीनभाई पटेल यांनी अध्यक्षीय भाषणात मोतीिबदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी केल्याबद्दल पद्मश्री डॉ. लहाने , डॉ. रागिणी पारेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र घुली यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महापौर अलका राठोड, उपमहापौर हारुन सय्यद, पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा