पूर्वापार असलेले कौटुंबिक ऋणानूबंध लक्षात घेऊन प्राज इंडस्ट्रीजचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक प्रमोद चौधरी यांनी हिंद सेवा मंडळाला ५१ लाख रूपयांची देणगी दिली. कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन मुळे यांनी अन्य संचालकांच्या उपस्थितीत या देणगीचा स्वीकार केला.
नगरचे थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती दादा चौधरी यांचे प्रमोद हे नातू आहेत. मंडळाच्या पटवर्धन चौक येथील शाळेला सेनापती दादा चौधरी यांचे नाव आहे. चौधरी परिवार व हिंद सेवा मंडळ यांचे तब्बल ६० वर्षांपासून भावबंध आहेत. प्रमोद यांचे वडिल कै. मधुकरराव चौधरी तसेच चुलते रामकाका चौधरी यांनी यापुर्वी मंडळाला तसेच शाळेलाही अनेक वेळा भेट दिली आहे. या ऋणानुबंधाचे स्मरण ठेवून प्रमोद चौधरी यांनी ही मंडळाला ही देणगी दिली.
यावेळी चौधरी परिवारातील श्रीमती परिमल चौधरी, रामकाका, पार्थ चौधरी आदी उपस्थित होते. प्रमोद यांच्या हस्ते मुळे यांनी देणगीच्या धनादेशाचा स्वीकार केला. मंडळाच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य शामराव निसळ, श्रीमती निसळ तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, मानद सचिव अविनाश आपटे, सुनिल रामदासी, अजित बोरा, संपत बोरा, शिरीष मोडक, शशिकांत भुतडा, मुख्याध्यापक अभय जामगावकर तसेच दिपक आरडे आदी उपस्थित होते.
मुळे यांनी सांगितले की दादा चौधरी विद्यालयात विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आधुनिक प्रयोगशाळा तसेच गुणवत्ता वाढीसाठीचे प्रकल्प, साहित्य यातून संस्थेच्या सर्वागिण शैक्षणिक विकासासाठी म्हणून या देणगीचा उपयोग करण्यात येणार आहे. स्वत: प्रमोद हेही यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

Story img Loader