दक्षिण मुंबईत जुन्या इमारतींच्या जागी उत्तुंग इमारती बांधणाऱ्या एका बिल्डरने आयोजित केलेल्या ‘वारी’ला तब्बल ४०० सरकारी अधिकारी गेले असले तरी आतापर्यंत प्रत्यक्षात ५१ अधिकाऱ्यांवरच कारवाई होऊ शकली आहे. हे सर्व अधिकारी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळातील अभियंते आहेत. विशेष म्हणजे या कारवाईनंतरही या अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी नियुक्तीची बक्षिसीही बहाल करून बिल्डरांशी हातमिळवणी केली तरी काहीही होत नाही, असा संदेश देण्यात आला आहे.
दोन-अडीच वर्षांपूर्वी एका बिल्डरने रामेश्वरम येथे ‘वारी’ काढली होती. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळासह पालिका, महसूल, नगरविकास खात्यातील ४०० अधिकाऱ्यांसाठी दोन खासगी विमानांची खास व्यवस्था या बिल्डरने केली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. म्हाडाने या प्रकरणी चौकशी करून ५१ अधिकाऱ्यांची नावे शासनाकडे सादर केली होती. या सर्व अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सेवाशर्तीविषयक नियमानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र उर्वरित साडेतीनशे अधिकाऱ्यांची साधी चौकशीही झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. ज्या बिल्डरने ही ‘वारी’ आयोजित केली होती, तोच म्हाडाच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) नुसार पुनर्विकास करीत होता. इमारत व दुरुस्ती मंडळाच्या अभियंत्यांचाच त्याच्याशी नेहमी संबंध येत होता. याच मंडळातील दोन उपमुख्य अभियंते, आठ कार्यकारी अभियंते, २३ उपअभियंते, एक विधी सल्लागार आणि शाखा अभियंत्यांनी या वारीला हजेरी लावली. या सर्वावर बिल्डरच्या वारीला गेल्यामुळे ठपका ठेवण्यात आला. परंतु हे अभियंते पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी नियुक्त झाले असून पुन्हा त्याच बिल्डरशी त्यांचा दररोज संबंध येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ‘ज्या बिल्डरने खास विमानाने वारीला नेण्याची मेहरबानी केली त्याबदल्यात हे अभियंते त्या बिल्डरवर मेहरबानी करतील, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.’ अशी तीव्र प्रतिक्रिया म्हाडातील एका अधिकाऱ्याने दिली.

* ‘वारी’तील वरिष्ठ लाभार्थी
नागनाथ येरावार, सतीश लोहकरे (उपमुख्य अभियंते), राजीव शेठ, दिनकर भुजबळ, बाळकृष्ण शिरवकर, राजेंद्र लोहार, नेमीनाथ शेट्टी, प्रदीप आगेकर, जयंत देवकर, महेश दलवानी (कार्यकारी अभियंते), रमाकांत शाळू (सहायक विधी सल्लागार), कमलेश मिरानी (वरिष्ठ स्वीय सहायक), नागनाथ चिंतामणी, माणिक चिमणकर, अनिल राठोड, नितीन गोरडे, दिनेश महाजन, प्रल्हाद महिषी, सिद्धेश्वर कोन्नूर, रुपेश तोटेवार, राजेंद्र टिकारे, दिलीप चौधरी, जी. पी. नाईक, रामचंद्र क्षीरसागर, भीमराव काळे, मुकेश सिकलीगार, पुष्कर सक्सेना, सुनील सोनार, महेश जामसांडेकर, दीपक घरत, अनिल चाफळकर, दिलीप चौधरी, संजय भोईर, महेश काठे, सुभाष चिमकोडे, तानाजी सावंत, भरत जानकोळी, बलबंत सिन्हा, मोहन रासकर, कमलाकर भोईर, शिरीष नाईक, दौलाल महाजन, नीलेश सूर्यवंशी, दत्तात्रय कानवडे, मोहन रासकर, झेड ई. जेफुल्लाह, भालचंद्र गौड, संजयकुमार राठोड, प्रसन्न अष्टपुत्रे.

Story img Loader