ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकामार्फत गेल्या सहा वर्षांत मुंब्रा तसेच दिवा भागातील अनधिकृत इमारतींवर अनेकदा कारवाई होऊनही त्याच ठिकाणी पुन्हा इमारती उभ्या राहिल्याचे भयावह वास्तव महापालिकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आले असून अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पथकाने यादी तयार केली आहे. या सर्व इमारतींना धोकादायक ठरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीच्या नोटिसा इमारतीतील रहिवाशांना लवकरच पाठविण्यात येणार आहे. मुंब्रा परिसरात अशा प्रकारच्या ५१६ अनधिकृत इमारती असून त्यांना महापालिका धोकादायक ठरविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येत असल्यामुळे महापालिकेमार्फत अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात येते. तसेच तेथील रहिवाशांना यासंबंधीची नोटीस धाडण्यात येते. यंदाही महापालिकेमार्फत अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली असून त्यातील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांची घरे येत्या १५ दिवसांत रिकामी करण्यात येणार आहे. असे असले तरी शीळ-डायघर येथील लकी कंपाउड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने यंदा सावध भूमिका घेतली असून अनधिकृत इमारतींचे आगार असलेल्या मुंब्रा तसेच दिवा भागाकडे विशेष लक्ष दिले आहे. मुंब्रा तसेच दिवा भागात गेल्या सहा वर्षांत नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींवर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात आली. मात्र, तरीही त्याच ठिकाणी पुन्हा इमारत उभारण्यात आल्या आहेत. अशाच इमारतींचा महापालिकेच्या विशेष पथकाने तीन महिन्यांत सर्वेक्षण केले आहे. महापालिकेच्या कारवाईमुळे इमारतीचे बांधकाम कमकुवत झालेले असते. असे असतानाही त्याच बांधकामावर इमारत उभारण्यात आल्यामुळे ती धोकादायक होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने अशा इमारती धोकादायक ठरविण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधी इमारतीतील रहिवाशांना नोटिसा धाडण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. मुंब्रा भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ५१६ इमारती असल्याचे यादीतून स्पष्ट झाले आहे. तसेच दिवा भागातील इमारतींचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झाले नसल्याने त्याचा आकडा समजू शकलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा