महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील ५२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ही माहिती दिली.
मनपा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी सत्यनारायण शुक्रवारी येथे आल्या होत्या. या दौऱ्यात सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मनपाचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय कुलकर्णी व अन्य निवडणूक अधिकारी या वेळी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा तथा निवडणूक प्रशासन यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे असे सांगून सत्यनारायण म्हणाल्या, मतदारांच्या ओळखपत्रावरील छायाचित्रांचे कामही शहरात चांगले झाले आहे. अवघे ८ हजार मतदार त्याविना असून या मतदारांना तसेच ज्यांना ओळखपत्रावरील छायाचित्रे बदलायची आहेत, अशांसाठी मतदानाच्या दिवशी खास बाब म्हणून पुन्हा छायाचित्रांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. बंगलोरच्या एका कंपनीशी याबाबत करार करण्यात आला असून, शहरात एकाच ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येईल. त्याचा उपयोग मात्र पुढच्या निवडणुकीत होईल असे सत्यनारायण यांनी सांगितले. नकाराधिकाराच्या मतदानाची त्यांनी माहिती दिली, त्याची डमी मतपत्रिकाही त्यांनी दाखवली.
प्रभाग २३ मध्ये नकाराधिकाराचे मतदान?
प्रभाग क्रमांक २३ ब मधील निवडणूक बिनविरोध झाली आहे. नव्या नियमानुसार मतदानात नकाराधिकार देण्यात आला आहे. या प्रभागाची बिनविरोध झाली असली तरी येथे नकाराधिकारासाठी येथे मतदानाची व्यवस्था कता येऊ शकेल असे सत्यनारायण यांनी सांगितले. त्याचा निर्णय लवकरच घेऊ असे त्या म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा