निर्मल भारत अभियानअंतर्गत २०१३-१४ साठी जिल्ह्य़ातून ५२ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव निर्मल ग्राम पुरस्कारासाठी राज्य शासनाला सादर करण्यात आले आहेत. या ग्राम पंचायतींची पूर्वतयारी व मार्गदर्शन तपासणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. ही तपासणी ३१ जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्य़ात निर्मल भारत अभियानाची सुरुवात झाल्यानंतर या वर्षी ५२ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. या ग्रामपंचायतींची तपासणी राज्य शासनाच्या पथकामार्फत करण्यात येऊन तपासणीत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून तपासणी करण्यात येत आहे. ग्राम पंचायतीची सद्य:स्थिती अपूर्ण कामे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय तपासणीचा कार्यक्रम दि. २२ ते ३१ जुलै असा ठरविण्यात आला आहे.
२२ जुलैला बुलढाणा, चिखली, २३ देऊळगावराजा, सिंदखेडराजा, २५ लोणार, मेहकर, २६ खामगाव, शेगाव, २७ संग्रामपूर, जळगाव जामोद, ३० नांदुरा, मोताळा, ३१ मलकापूर या तालुक्यातील एकूण ५२ गावांची तपासणी करण्यात येणार आहे. निर्मल ग्राम पुरस्कारासाठी आवश्यक निकषांमध्ये १०० टक्के वैयक्तिक शौचालय बांधकाम, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत स्वच्छतागृह, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता पिण्याचे पाणी योग्य हाताळणी या बाबीसाठी गुणांकन पध्दती देण्यात आली आहे. ९० गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत निर्मल पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे.
जिल्हास्तरीय पथकात आरोग्य सल्लागार जी.एस.घाइट, समाजशास्त्र विभागाचे समीर बेग, क्षमता बांधणीचे संतोष साखरे, स्वच्छता विभागाचे, नीरज ठोसर, संदीप पाटील, पेयजलचे संदीप सुखदान, प्रणिता अंभोरे, मनिषा शेजव, किरण शेजोळ, वित्त विभागाचे वाकोडे यांचा समावेश राहणार आहे. जिल्हास्तरीय तपासणीत संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रंजना कंकाळ यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा