रविवारपासून (दि. १८) सुरू होणाऱ्या ५२व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनाची तयारी होत आली असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह दिग्गज राजकीय नेतेही येथे होणाऱ्या या अधिवेशनास उपस्थित राहाणार आहेत.
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील मैदानात अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ व मराठवाडा मुख्याध्यापक संघाच्या वतीने हे अधिवेशन होणार आहे. भास्करराव आर्वीकर संमेलनाचे अध्यक्ष, तर डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील स्वागताध्यक्ष आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आहेत. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, डी. पी. सावंत, पालकमंत्री प्रकाश सोळंके उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी (दि. १९) शोध निबंधाचे वाचन व मान्यवरांचे मार्गदर्शन असे पहिले सत्र असून, या सत्रास शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत. विविध विषयांवर अनिल गुंजाळ (पुणे), सतीश जगताप (वर्धा), रघुनाथदादा मोते (कोकण), दिलीप सहस्त्रबुद्धे (लातूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या सत्रात ‘मोफत व सक्तीचे शिक्षण: अधिनियम व अंमलबजावणीतील वास्तव’ या विषयावर एम. पी. सुरगडे यांचे सादरीकरण होणार असून, ‘सरकारचे शैक्षणिक धोरण’ या विषयावर डॉ. श्रीधर साळंके, माणिक गुट्टे, प्रकाश पठारे, ए. व्हाय. हटकर, पी. पी. साबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सचिवांचा सत्कार होईल. अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचा समारोप होणार आहे. खासदार गोपीनाथ मुंडे, आमदार सुभाष देसाई, विजय नवल पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. या शैक्षणिक संमेलनास राज्यातील विविध शाळातील दहा हजाराहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित राहतील, असा दावा संयोजकांनी केला. अधिवेशनासाठी मोठे व्यासपीठ व भव्य मंडप तयार केला आहे. ग्रंथ खरेदीसाठी ४० स्टॉल उभारले आहेत. निवास, भोजन आदी व्यवस्थांवर संयोजकांनी काल अंतिम हात फिरवला. या वेळी विभागीय उपाध्यक्ष गोविंदराव मुंडे, जिल्हाध्यक्ष डी. एल. उमाटे, कार्याध्यक्ष एस. टी. गरुड, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजू शिंदे, यू. एस. चापके आदी उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा