अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी ८२ काळजीवाहक महिलांची नियुक्ती करण्यात आली. दोन वष्रे त्यांनी अपंग विद्यार्थ्यांची सेवा केली. यात कपात करून केवळ २७ काळजीवाहकांना पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याने उर्वरित ५५ काळजीवाहक घरी बसले. परिणामी, १२८ अपंग विद्यार्थ्यांची काळजी रामभरोसे राहणार आहे. शिवाय, त्या काळजीवाहकांपुढे उदरनिर्वाहाचाही गंभीर प्रश्न उभा झाला आहे. दरम्यान, बेरोजगार झालेल्या काळजीवाहक महिलांनी कामावर पुन्हा घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, माजी सभापती विजय रहांगडाले व संबंधितांना सादर केले.
जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६ हजार ५८० अपंग विद्यार्थी अध्ययन करत आहेत. यापकी २०४ अपंग विद्यार्थ्यांना काळजीवाहक स्वयंसेवक महिलांची आवश्यकता असताना शासनाने केवळ २७ काळजीवाहकच घेण्याचा निर्णय घेतल्याने पूर्वी कार्यरत ५५ काळजीवाहक महिलांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला असून त्या अपंग विद्यार्थ्यांची काळजी व देखरेख कोण करणार, हा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. शाळेतील अपंग विद्यार्थ्यांच्या माता-पालकांमधूनच एका पालक मातेची काळजीवाहक म्हणून व्यवस्थापन समित्यांमार्फत नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्य़ातील एकूण ८२ शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी काळजीवाहक रुजू झाल्या; परंतु चालू सत्रात केवळ २७ काळजीवाहक घेण्याचे शासनाचे फर्मान आल्याने इतर काळजीवाहक समस्येत सापडल्या आहेत. शाळेत येणाऱ्या अतिअपंग विद्यार्थ्यांची देखरेख, त्यांची काळजी घेणे, विद्यार्थ्यांना शाळेत आणणे इत्यादी कामे काळजीवाहक करतात. परंतु, ते नसल्याने अनेक अपंग विद्यार्थी घरीच तर बसणार नाही ना, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत काळजीवाहकांची नेमणूक करण्यात आली असून प्रति विद्यार्थी १ हजार रुपये महिना आणि जास्तीतजास्त ४ हजार रुपये महिना या मानधन तत्त्वावर त्यांची नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, अपंग विद्यार्थ्यांना भविष्यात शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्यांच्या शस्त्रक्रिया व त्यांची काळजी ही महत्त्वपूर्ण कामे काळजीवाहकांनी यापूर्वी केली. तालुका संयोजकांच्या मदतीने अनेक अपंगांच्या शस्त्रक्रिया मोफत पार पडल्या; परंतु आता शासनाने काळजीवाहकांना काढून एक प्रकारे त्यांच्यावरच नाही, तर अपंग विद्यार्थ्यांवरही अन्याय केला असल्याचा आरोप होत आहे. ८२ पकी २७ काळजीवाहकांची नेमणूक ही त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती आहे. निवडलेल्या काळजीवाहकांमध्ये ८ महिला अपंग विद्यार्थ्यांना शिकविण्याचे प्रमाणपत्रधारक, ३ महिला अंध विद्यार्थ्यांना ब्रेललिपी शिकविणाऱ्या, संशोधन कक्षात १ आणि इतर ६ महिलांची निवड एका शाळेत ८ ते ० अपंग विद्यार्थ्यांची संख्या असणाऱ्या शाळेत करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अपंग विद्यार्थ्यांची देखरेख करण्याचा प्रश्न गंभीर असल्याने शासनाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये विरोध जाणवत आहे. बेरोजगार झालेल्या काळजीवाहकांनी पुन्हा सेवेवर घेण्यात यावे, या मागणीसह शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती व उपाध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले असून सेवेवर घेण्याची मागणी केली. निवेदन देताना अजवंता गराडे, सुरेखा दमाहे, रेखा राहग, प्रमिला बरेकर, अर्चना आस्टीकर, ऊर्मिला तुमसरे, सुनंदा मौजे, भुमेश्वरी चौधरी, रेखा रहांगडाले आदी उपस्थित होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा