तेरा महिन्यांपासून सर्व म्हणजे ५५ कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याची कैफियत भू-विकास बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मांडली. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांच्या दैन्यावस्थेबद्दल व्यवस्थापक आनंदराव तणखुरे, तसेच बी.के. देशमुख, प्रमोद बोर्डे, अनंत जाधव आदिंनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, २००१ पासून बुलढाणा जिल्हा बॅंक शेतीकर्ज व इतर उद्देशाकरिता केलेल्या कर्ज वाटपातून वसुलीचे काम सुरू आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास अर्थात, भू-विकास बॅंकेत सध्या ५५ कर्मचारी आहेत. या सर्वाचे जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ पर्यंतचे पगार १९७ लाख रुपये थकित आहेत. तसेच थकित हप्ते ९८.८० लाख रुपये आणि नियमित सेवानिवृत्त झालेल्या १८ कर्मचाऱ्यांचे ३१ मार्च २००९ ते ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत ग्रॅज्युईटी व रजेच्या पगाराची रक्क म १२६.३१ लाख रुपये, अशी एकूण ४०७.४१ लाख देणी प्रलंबित आहे.
याबाबत शिखर बॅंकेने वेळोवेळी माहिती मागितली, मात्र अद्यापपर्यंत रक्क म प्राप्त झालेली नाही. अशा स्थितीत जानेवारी २०१२ पासून भूविकास बॅंक कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांवर व कुटुंबियांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. मुलांचे शिक्षण करू शकत नसल्याने मुलांना घरी बसावयास भाग पडत आहे. शिखर बॅंकेतील कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत असून जिल्ह्य़ातील कर्मचाऱ्यांचे पगार मात्र जानेवारी २०१२ पासून झालेले नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशीही मागणी करण्यात आली. याप्रसंगी एस.एन.कोलते, आर.डी. सोनोने, ए.एस. जाधव, डी.के. दरामल, बी.एस.जगताप, जी.जी.काळे, के.के.देशमुख, एन.एन.खर्चे, ए.टी.वाघमारे, एम.एस.बेलोकार, टी.आर.चव्हाण, डी.एस.चतुर, पी.जी.गोगे, बी.पी.बऱ्हाटे, एस.एन.इंगळे, पी.डी.धोरण, ए.एन.मोवाडे, एस.सी.इंगळे, डी.जी.काळे आदी उपस्थित होते.

Story img Loader