पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते धानोरा काळे रस्त्यावर गुरूवारी पोलिसांनी ६ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा टेम्पोसह जप्त केला. व्यापारी महमंद नूरमहंमद सरवर (माळीगल्ली, परभणी) व टेम्पोचालकास अटक करण्यात आली. महिनाभरात पोलिसांनी जिल्ह्य़ात ११ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
गुटखाबंदी असतांना परभणी जिल्ह्यात सितार व माणिकचंद पुडय़ांची सर्रास विक्री केली जात आहे. ही बाब अन्न व भेसळ प्रशासनास माहीत असतानाही गुटखाबंदीसाठी या विभागाकडून आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही. राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर गुटखा जप्तीच्या कारवाया पोलिसांनीच केल्या. अन्न भेसळ अधिकारी पोलिसांनी गुटखा जप्त केल्यानंतर व त्यांच्या कार्यालयाला पोलिसांकडून माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचतात व पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करुन माल ताब्यात घेतात. मालाची विल्हेवाट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने लावली जाते. परंतु विल्हेवाट लावतानाही काही माल पुन्हा व्यापाऱ्यांना विकला जातो, अशा तक्रारी यापूर्वी जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यामुळे अन्न भेसळ प्रशासनाचा भ्रष्ट कारभार यातून उघड होत आहे.
२० व ३० एप्रिललाही पोलिसांनी ४ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. गुरुवारी दुपारी ताडकळसचे सहायक पोलीस निरीक्षक बोर्डे यांनी ताडकळस-धानोरा रस्त्यावर महावितरण कार्यालयासमोर एमएच ०४ सीए ३४९२ क्रमांकाचा टेम्पो पकडला. टेम्पोची झडती घेतली असता ५ लाख ४० हजार रुपये कि मतीचा सितार गुटखा व १ लाख २० हजार रुपयांचा आरएमडी गुटखा मिळून आला. अन्न सुरक्षा अधिकारी संजय चट्टे यांच्या तक्रारीवरून व्यापारी महमंद सरवर व टेम्पोचालक सुरेश विठ्ठलराव कोटलवार (कवठा, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

Story img Loader