गव्याच्या कळपाने केलेल्या धुमाकुळामध्ये देवाळे, हळदी, कांडगाव या परिसरातील सहा व्यक्ती जखमी झाल्या. यामध्ये शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. बिथरलेला एक गवा पळून जात असताना विहिरीत पडून मृत्यू पावला. या घटनेची परिसरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
कोल्हापूर-राधानगरी रोडवर देवाळे गाव आहे. तेथे चांगल्या प्रकारे शेती पिकली जाते. उसाचे पीक मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात गव्यांचा कळप आला असावा. सुमारे सहा गव्यांचा यामध्ये समावेश होता. त्यांना पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. रस्त्यावरून जाणारे प्रवाशीही ही गंमत पाहात राहिले. उभ्या पिकांचे नुकसान होत राहिल्याने ग्रामस्थांनी गव्यांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनक्षेत्रपाल आर. जी. देवळे व सहकारी, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बेग, विलास सुपे यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी, व्हाईट आर्मीच्या पंधरा कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले. जमावाकडून गव्यांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून गवे बिथरले. ते दिशा मिळेल त्या मार्गाने बेभानपणे पळत सुटले.
पळताना कळपाची दोन गटांत विभागणी झाली. पळत जाणाऱ्या कळपाने अनेकांना धडक मारली. डोके, हात, पाय अशा विविध ठिकाणी जबर मार लागला. त्यामध्ये सहाजण जखमी झाले. त्यामध्ये चांगुबाई नारायण चव्हाण (वय ६५), भीमराव चुयेकर (वय ५०), सदाशिव कांबळे (वय ५५, सर्व रा. कांडगाव), प्रवीण सर्जेराव पाटील (वय ३२, रा. देवाळे), पांडुरंग पाटील (वय ५५, रा. कुरडू) व ‘एबीपी माझा’चे कॅमेरामन रणजित बागल हे सहाजण जखमी झाले. तर देवाळे येथून धावणारा एक गवा विहिरीत पडल्याने मृत्युमुखी पडला. त्याचा नंतर अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनी गव्यांनी हल्ला केलेल्या परिसरात तसेच सीपीआरमध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली.

Story img Loader