तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहा ग्रा.पं.वर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाचा झेंडा फडकला. उर्वरित दोन ग्रा.पं. राष्ट्रवादीला मिळाल्या. वाकडी या महत्वाच्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव करत दहा वर्षांनंतर विखे गटाने सत्ता मिळवली, तर कोऱ्हाळे येथे डॉ. राजेंद्र पिपाडा समर्थक गटाने बाजी मारली.
आठ ग्रामपंचायतींसाठी आज तहसीलमध्ये मतमोजणी झाली. वाकडी, पिंप्री निर्मळ, दाढ बुद्रुक, दुर्गापूर, धनगरवाडी व निमगाव कोऱ्हाळे या सहा पंचायतींवर मंत्री विखे गटाने सत्ता मिळवली. दहेगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे शंकरराव कोल्हे गटाच्या विठ्ठलराव डांगे यांनी सर्व जागा जिंकत सत्तांतर केले. विखे गटाचा तेथे दारूण पराभव झाला. कोऱ्हाळे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र पिपाडा समर्थक संजय हेकरे यांच्या गटाने ११ पैकी ६ जागा जिंकत निसटता विजय मिळवला. विखे गटाला तेथे ५ जागांवर समाधान मानावे लागले.  
पिंप्री निर्मळ येथे आदर्श व जनसेवा या विखे समर्थक मंडळांतच लढत होऊन १३ पैकी ८ जागा जिंकत आदर्श मंडळाने जनसेवाचे १५ वर्षांपासूनचे वर्चस्व मोडीत काढले. वाकडी या महत्वाच्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव करत दहा वर्षांनंतर विखे गटाने १४ पैकी १२ जागा जिंकत सत्तांतर घडवले. येथे राष्ट्रवादीला व शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. दाढ बुद्रुक येथे विखे गटाच्या जनसेवा मंडळाने १५ पैकी १४ जागा जिंकत सत्ता अबाधित राखली. दुर्गापूर, धनगरवाडी व निमगाव कोऱ्हाळे या तिन्ही ग्रामपंचायती विखे गटाने बिनविरोध करत ताब्यात ठेवल्या.