शहर बस वाहतूक करणारी कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलला बस गाडय़ांसाठी महानगरपालिकेने बुरूडगाव रस्त्यावरील कचरा डेपोची जागा सुचवली आहे, मात्र ती त्याला देईपर्यंत जागेपोटी महिना ६० हजार रुपये भाडे देण्यास मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली.
समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज समितीची सभा झाली. या सभेत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.
कंत्राटदारांशी सुरुवातीलाच झालेल्या कररानुसार बस गाडय़ांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपाची आहे, मात्र मनपा अद्यापि ही जागा देऊ शकली नाही. ही कंपनी त्यासाठी सध्या खासगी जागेचा वापर करत असून त्यापोटी कंपनीला महिना ६० हजार रुपये भाडे द्यावे लागते. ही सुविधा तोटय़ात असल्याचे कारण देऊन कंपनीने सेवा बंद करण्याची नोटीस मनपाला दिली आहे. तोटय़ाबरोबरच कंपनीने जी आठ कारणे दिली आहेत, त्यात जागेचाही प्रश्न समाविष्ठ आहे. कंपनीच्या या पत्रानुसारच स्थायीच्या आजच्या सभेत हा विषय मंजुरीला ठेवण्यात आला होता.
नगररचना विभागाने कंपनीला बुरूडगाव रस्त्यावरील कचरा डेपोची जागा आगारासाठी सुचवली आहे. त्याचा निर्णय प्रलंबित आहे. ही जागा सुमारे ६ एकर आहे. ती जागा उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा सुरू आहे, मात्र तोपर्यंत कंपनीला त्यापोटी भाडय़ाचे पैसे देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
दरम्यान मनपाने त्यासाठीच एसटीची जुन्या बसस्थानकामागील जागा मागितली आहे. तसा प्रस्तावही एसटीला देण्यात आला आहे. यासंदर्भात एसटीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर यांच्याकडे नुकतीच मनपाची बैठक झाली. त्यात ही जागा देण्यास कपूर यांनी अनुकूलता दर्शवली असून ही जागा मिळाली तर हा प्रश्नच सुटेल.

Story img Loader