बारावीची परीक्षा गुरुवारपासून (दि. २१)सुरु होत आहे, त्यासाठी जिल्ह्य़ातून ५९ हजार ९३० परीक्षार्थी दाखल होत आहे तर दहावीची परीक्षा दि. २ मार्चपासुन सुरु होत असुन त्यासाठी जिल्ह्य़ात ७२ हजार ९८३ परीक्षार्थी आहेत. दोन्ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकुण २२५ ठिकाणी केंद्रनिहाय दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एस. जी. मंडलिक यांनी ही माहिती दिली. बारावीची परीक्षा २६ मार्चपर्यंत चालेल, त्यासाठी जिल्ह्य़ात एकुण ६९ परीक्षा केंद्र आहेत, त्यातील एसएसजीएम (कोपरगाव), जनता विद्यालय (पाथर्डी), वृद्धेश्वर कनिष्ठ कॉलेज (तिसगाव) व डी. पी. राजळे कनिष्ठ कॉलेज (पाथर्डी) हे चार केंद्रे परीक्षा मंडळाने उपद्रवी ठरवली आहेत.
दहावीची परीक्षा २५ मार्चपर्यंत चालेल, त्यासाठी १५६ केंद्रे आहेत. त्यातील एस. जी. विद्यालय (कोपरगाव), रेसिडेन्सिअल विद्यालय (शेवगाव), आबासाहेब काकडे विद्यालय (शेवगाव), जवाहर विद्यालय (चांदा), श्री तिलोक जैन विद्यालय (पाथर्डी), शिवाजी विद्यालय (शिवाजीनगर, राहुरी) ही ६ केंद्रे उपद्रवी ठरवली गेली आहेत.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आज जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक घेतली. त्यास वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, निरंतरचे शिक्षणाधिकारी तसेच ‘डाएट’चे प्राचार्य यांचे ४ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना परिक्षा केंद्रांना भेटी देण्याची सुचना करण्यात आली आहे. परिक्षार्थीना केंद्राबाहेरील जमावाचा उपद्रव जाणवत असतो, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २२५ ठिकाणी केंद्रनिहाय दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यात सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, तरुण मंडळांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. काही अडचण जाणवल्यास केंद्र प्रमुखांना पोलिसांना पाचारण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
जिल्ह्य़ासाठी दोन समुपदेशक
दहावी व बारावीच्या परिक्षार्थीना अभ्यास व परीक्षा विषयक मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाने केली आहे तसेच हेल्पलाईनही तयार केली आहे. नगर जिल्ह्य़ासाठी प्रा. टी. एम. बांगर (मो. ९७६३५५७१३१, न्यु आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज) व एस. एल. कानडे (मो. ९९२२३२११९८ किंवा ९०२८०२७३५३, ज्ञानसरीता विद्यालय, वडगाव गुप्ता, नगर) यांची समुपदेशक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. १२ वीसाठी ६५२९२३१६ व १० वीसाठी ६५२९२३१७ अशी हेल्पलाईन आहे. पालक व विद्यार्थ्यांनी समस्या असल्यास सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान संपर्क करण्याचे अवाहन मंडळाच्या विभागीय सचिवांनी केले आहे.

Story img Loader