शेतक ऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात ही संकल्पना घेऊन जिल्हा कृषी व पणन विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात प्रथमच आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या तांदूळ महोत्सवात वाडय़ाच्या ‘वाडा कोलम’ ने चांगलाच भाव खाल्ला. तीन दिवसांत तब्बल ११०० टन तांदळाची विक्रमी विक्री येथे झाली. यामध्ये वाडा कोलम तांदळाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले.
या तांदूळ महोत्सवात ७० स्टॉल्समधून ठाणे जिल्ह्य़ातील ७२५ शेतकऱ्यांनी आपले गट तयार करून १८ जातींचा तांदूळ उपलब्ध केला होता. किमान २५ रुपयांपासून ते कमाल ६० रुपयांपर्यंत दर असलेल्या या तांदळामध्ये ‘वाडा कोलम’ जातीच्या तांदळाला ४५ ते ५५ रुपयांपर्यंतचा भाव मिळाला.
वाडा तालुक्यातील ८५ शेतक ऱ्यांनी या महोत्सवात १२ स्टॉल्स मांडून वाडा कोलमसह अन्य जातींतील ११०० क्विंटल तांदळाची विक्रमी विक्री केली. या विक्रीतून वाडय़ातील शेतक ऱ्यांना ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले.
ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव उपयोगी ठरला.
ग्रामीण भागात पिकणारे कृषी उत्पादन ठाण्यासारख्या शहरात ग्राहकांना उपलब्ध व्हावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरासह जिल्ह्य़ातील अन्य प्रमुख शहरांमध्ये असे तांदूळ महोत्सव वर्षांतून तीन ते चार वेळा शासनाने आयोजित करावेत, अशी मागणी वाडय़ातील ‘वाडा कोलम’चे उत्पादक शेतकरी हरिभाऊ पाटील यांनी केली. तर तांदूळ महोत्सवाप्रमाणेच कडधान्य महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाडा तालुक्यातील कोनसई येथील शेतकरी नंदकुमार मोकाशी यांनी केली.
दरम्यान या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांच्यासह शेतकरी, विक्रेते आणि ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा