गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात घरफोडय़ा वाढल्या आहेत. गेल्या सात महिन्यांत ६३६ घरफोडय़ा झाल्या असून रोज सरासरी तीन घरफोडय़ा होत आहेत. अधूनमधून आरोपी पकडले जात असले तरी घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे.
शहर पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ जुलै २०१३ या कालावधीत शहरात ६०९ घरफोडय़ा झाल्या. त्यापैकी ५२८ घटनांचा तपास लागलेला नाही. यंदा १ जानेवारी ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत शहरात ६३६ घरफोडय़ा झाल्या. त्यापैकी ४८८ घटनांचा तपास लागलेला नाही. गेल्या दोन महिन्यात  १ जून ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत १७५घरफोडय़ा झाल्या. त्यापैकी १५७ घटनांचा तपास लागलेला नाही. चोरी अथवा घरफोडी हा अनादी कालापासून सुरू असलेला गुन्ह्य़ाचा प्रकार आहे. मात्र, वर्तमान काळात चोरी अथवा घरफोडय़ांचे गुन्हे चांगलेच वाढले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत नागपुरात १ हजार ११० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. घरफोडय़ांच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
रोज सरासरी तीन घरफोडय़ा शहरात होत आहेत. बनावट चावीने कुलूप उघडून अथवा कुलूप तोडून घरफोडय़ा पूर्वी होत होत्या. आता तर थेट कुलूपकोंडा तोडून घरफोडय़ा होत असून त्यांचे प्रमाणही जास्त आहे. आतून दार बंद असेल तर कडीजवळ ड्रिलिंग करून हात घालून कडी काढायची, अशी पद्धत होती. आता तर आवाज न करणाऱ्या ड्रिलींग अथवा आऱ्या आल्या आहेत. खिडकीचे ग्रिल तोडून अथवा काढूनही घरफोडय़ा अधूनमधून होतात. घरात कुणी नसल्याचे पाहून चोरटे नेमके संधी साधतात. दाट लोकवस्तीत असो, विरळ असो वा फ्लॅट इमारत, कुलूपकोंडा तोडण्यापर्यंत मजल चोरटय़ांची गेली आहे. त्याचा आवाज होत नाही का, असा प्रश्न पोलिसांपुढेही निर्माण होतोच. उत्तररात्री गाढ झोपेच्यावेळी या घरफोडय़ा होतात. मात्र, आता दिवसा ढवळ्याही त्या होत आहेत.
अनेक इमारतींमध्ये रखवालदार ठेवला जात नाही. रखवालदार असलेल्या इमारतींमध्येही घरफोडय़ा होत असल्याने पोलीसही अनेकदा अवाक् होतात. घरफोडय़ांचे प्रमाण वाढते प्रमाण नागरिकांची चिंता वाढवणारे ठरले आहे. घरच सुरक्षित नाही, असा याचा अर्थ निघतो. सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस आहेत कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. घरफोडय़ा अथवा चोऱ्यांच्या तपासाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. जुलै महिन्यात घडलेल्या घरफोडय़ांपैकी केवळ तेरा टक्के तर जून महिन्यात केवळ आठ टक्के घरफोडय़ांच्या शोध लागला. पोलिसांचे वाहन प्रत्येक भागात फिरत असते. रात्रीही शिपाई ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गस्त असते. याशिवाय दुचाकीवरही दोन शिपाई (चार्ली) चोवीस तास फिरतच असतात, असे पोलीस सांगतात. मग घरफोडय़ा होतातच कशा, असा प्रश्न कायम रहातोच. चोरटे व पोलिसांचे संबंध लपून राहिलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी दक्षिण नागपुरात राहणाऱ्या एका अट्टल चोरटय़ाला एका पथकाने पकडले. दोन दिवसांपूर्वीच तुमचे नाव सांगून काही शिपाई हप्ता घेऊन गेले, असे चोरटय़ाने सांगताच शहर पोलीस दल हादरून गेले होते. चौकशीत काही शिपायांची नावे समोर आल्याने त्यांना निलंबितही करण्यात आले होते. गुन्हेगारांकडून काही पोलीस हप्ते घेतात, हे तेव्हा उघड झाले. घरफोडय़ांचा तपास का लागत नाही, या प्रश्नाचे उत्तर यात दडले आहे.
नागरिकांचा निष्काळजीपणा घरफोडय़ांसाठी तेवढाच कारणीभूत आहे. नागरिकांनीही सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. दार, दाराचा कडीकोंडा तसेच कुलूप भक्कम असले पाहिजे, खिडकीचे ग्रिल स्क्रु लावलेले नको तर त्या भिंतीत पक्क्क्या रोवलेल्या असाव्या, वगैरे सूचना सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अनेकदा करतात. पण, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. घरी, अपार्टमेंट, दुकाने अथवा प्रतिष्ठानांमध्ये सी.सी. कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलीस देतात. अनेकांनी त्यावर अंमल केला आहे. घरातही सी. सी. कॅमेरे लावावयास हवे. मात्र, हे अनेकांना शक्य नसते. मौल्यवान वस्तू, रक्कम बँकेत सुरक्षित असतात. यासंबंधी काळजी घेतली जात नाही. हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय आहेत. या उपाययोजना केल्यात तर किमान नुकसान तर टाळता येईल. पोलिसांचा अध्र्याहून अधिक वेळ बंदोबस्तात जातो. शिल्लक वेळेत पोलीस कुठेकुठे लक्ष देणार. लोकसंख्या जास्त, क्षेत्र मोठे आणि पोलिसांचे मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती झाली आहे. तरीही पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतात. आरोपींना पकडतात. गुन्हेगारांशी संबंध असल्याचे उघड झाल्यास पोलीस असले तरी त्यांच्यावर वेळोवेळी कायदेशीर केली जाते. कायद्यासमोर सर्वच समान असतात, अशी प्रतिक्रिया यासंबंधात बोलताना एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा