लोकसभा निवडणुकीचे अहोरात्र काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला देण्यास निवडणूक आयोगाने पाच महिने दिरंगाई केल्यामुळे विधानसभा निवडणुकीशी संबंधित कामांची नवीन जबाबदारी स्वीकारण्यास शासकीय कर्मचारी फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल ६५४२ कर्मचाऱ्यांना जादा कामापोटी पावणे तीन कोटींचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. त्यात विधानसभा निवडणुकीच्या कामांची जबाबदारी टाकली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. निवडणूक आयोगाला ‘सैन्य पोटावर चालते’ याचा विसर पडल्याची त्यांची भावना आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीशी संबंधित कामांसाठी विविध शासकीय विभागांतून कर्मचाऱ्यांना बोलाविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामाचे एकदा आदेश निघाले की, काही अपवादात्मक स्थिती वगळता कोणालाही ते काम टाळता येत नाही. यामुळे कोणाची इच्छा असो वा नसो, ज्यांच्या नावे आदेश प्राप्त झाले, त्या सर्वाना निवडणूक कामास जुंपावे लागते. या कामाचा निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाच्या अर्हतेनुसार मोबदलादेखील दिला जातो. मोबदला निश्चित करताना आचारसंहिता काळात केले जाणारे दैनंदिन काम आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणीच्या दिवशी केले जाणारे काम अशा स्वतंत्र गटात हा मोबदला कर्मचाऱ्यांच्या पदरात पडतो. लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदान व मतमोजणी प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने मोबदला दिला. तथापि, आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जादा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यास दिरंगाई केली आहे. निवडणुकीशी संबंधित या कामात थोडे थोडके नव्हे, तर तब्बल साडेसहा हजारहून अधिक कर्मचारी समाविष्ट होते. पाच महिन्यांपासून हे पैसे मिळत नसल्याने कर्मचारी वैतागले असून विधानसभा निवडणुकीशी संबंधित काम करण्यास ते उत्सुक नाहीत.
शासकीय कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजाचे सात तास गृहीत धरले जातात. लोकसभा निवडणुकीचे काम कर्मचाऱ्यांनी दररोज त्याहून अधिक काळ केले होते. सायंकाळी सहा वाजेनंतर होणाऱ्या जादा तासांचा मोबदला प्रत्येकाला मूळ वेतनानुसार देण्यात येणार आहे. मूळ वेतन गृहीत धरून प्रत्येकाला जितके तास जादा काम केले, त्याचा मोबदला निवडणूक आयोग देते. या मोबदल्याची एकूण रक्कम जवळपास पावणे तीन कोटी रुपये असल्याचे निवडणूक शाखेतील अधिकारी वंदना खरमाळे यांनी सांगितले. जादा कामाचा मोबदला पुढील १५ दिवसांत कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहे. परंतु तो रखडल्याने दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा खरमाळे यांनी केला.
चार हजार पोलीस कर्मचारीही भरडले
लोकसभा निवडणुकीच्या काळात बंदोबस्ताची भिस्त सांभाळणारे चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीमुळे भरडले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी दैनंदिन कामाच्या वेळेव्यतिरिक्त जादा काम करणाऱ्या जवळपास चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने मोबदला दिलेला नाही. इतर शासकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्या कामाच्या वेळेत फरक आहे. शासकीय कर्मचाऱ्यासाठी दैनंदिन सात तास गृहीत धरले जातात. पण पोलीस कर्मचाऱ्यांचे तसे नाही. प्रत्येकाला किमान १२ तास आणि कधीकधी त्या वेळेव्यतिरिक्तही काम करावे लागते. निवडणुकीतील जादा कामाचा मोबदला निवडणूक आयोगाने त्यांना दिलेला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ६५४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभेतील जादा कामाचा मोबदला तातडीने देण्याचा प्रस्ताव पाठविला असून तो लवकर मिळू शकेल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Story img Loader