साधारण तासभर सुरू झालेले संचलन, बघ्यांची तोबा आणि बेशिस्त गर्दी, अपुरी सुरक्षा व्यवस्था, संचलन सुरू झाल्यानंतर सलग नव्हे तर तब्बल पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने येणारे चित्ररथ आणि रखरखीत उन यामुळे मोठय़ा उत्साहाने रविवारी सकाळी मरिन ड्राइव्हवर आलेल्या देशभक्तांचा पुरता हिरमोड झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनाची झलक ‘याची देही याची डोळा’ पाहावयास मिळणार म्हणून मुंबईत पहिल्यांदाच होत असलेल्या संचलनाची जोरदार जाहिरात करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत हजारो मुंबईकरांनी सकाळी ७.०० पासूनच मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी केली होती. मात्र..
संचलन पाहण्यापेक्षा अनेकांना फक्त चित्ररथाच्या पाश्र्वभूमीवर स्वत:चे फोटो काढून घेण्यात रस असल्याचे दिसत होते. खरेतर विविध चित्ररथ हे या संचलनाचे आकर्षण असायला हवे होते. मात्र, सर्वात शेवटी झालेली विन्टेज कार रॅली आणि त्या गाडय़ांमध्ये स्वार झालेले चित्रपट कलाकार यांनाच पाहण्यामध्ये अनेकांना रस होता. सलमान खान, रणबीर कपूर, प्रीती झिंटा, सुश्मिता सेन यांना पाहण्यासाठी तरूण-तरूणींनी एकच गोंधळ केला. त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी अनेकजण सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या रेलिंगवर, झाडावर, स्पीकर आणि लाईट्सच्या खांबांवर चढले होते.
मुळात, संचलन सुरू व्हायला जवळपास तासभर उशीर झाला. आणि नंतरही चित्ररथ भरभर पुढे सरकत नव्हते. पुढचा चित्ररथ येईपर्यंत ५ ते १० मिनिटांचा वेळ लागत होता. चित्ररथ समोर आल्यावर पुढे खुर्चीवर बसलेले प्रेक्षक उभे राहत आणि त्यांच्यामागे उभ्या असलेल्या बघ्यांचा गोंधळ सुरू होई. या नादात चित्ररथ पुढे निघून जात होता. एअर इंडिया इमारतीपासून सुरू झालेल्या या संचलनातील कलाकार चर्चगेट स्थानकापर्यंत पोहचेपर्यंतच थकून जात होते. त्यामुळे चर्चगेट स्थानकापासून पुढे असलेल्या प्रेक्षकांना अर्धमेले कलाकारच बघावे लागत होते.
तासभर चाललेल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर, आधी बोट शो होणार अशी अफवा पसरली आणि सर्वानी मरिन ड्राइव्हच्या कट्टयावर धाव घेतली. हा सगळा प्रकार इतकाभयानक होता की, गर्दीमुळे कट्टय़ावरून अनेकजण समुद्रात पडतील की काय अशी भीती वाटू लागली. राष्ट्रगीत झाल्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार म्हणून सर्वानी माना वर केल्या. परंतु केवळ प्रमुख पाहुण्यांवरच पुष्षवृष्टी झाली. नुसतेच हवेत गिरटय़ा घालणारे हॅलिकॉप्टर पाहून पोलीस जिमखान्यापर्यंत पसरलेल्या गर्दीची चांगलीच निराशा झाली. संचलन सुरू होताच समुद्राच्या पलीकडील फुटपाथवरील नागरिक रस्त्याच्या मध्यभागी आल्याने त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागत होती. उशीरा येणारे चित्ररथ, उन्ह यामुळे अनेकांनी तर अध्र्यातूनच काढता पाय घेतला. एकूणच, अपुरी व चुकीची सुरक्षा व्यवस्था, ढिसाळ नियोजन आणि प्रसिध्दिीच्या हव्यासायी करण्यात आलेली उधळपट्टी उत्साहाचा हिरमोडच करणारी ठरली.

Story img Loader