मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला माल व प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून  ६६६ कोटींचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात नऊ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या उत्पन्नात केवळ एक टक्का वाढ झाली, तर याउलट २० टक्के उत्पन्न प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळाल्याचे दिसून येते.
२०११ वर्षांत सोलापूर विभागात तीन कोटी १० लाख प्रवाशांनी रेल्वेगाडय़ांतून प्रवास केला होता व त्या माध्यमातून १६२ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर मागील २०१२ वर्षी तीन कोटी ३१ लाख प्रवाशांनी प्रवास करीत २० टक्के जादा म्हणजे १९५ कोटींचे उत्पन्न मिळवून दिले. मालवाहतुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाने मात्र अपेक्षित पल्ला गाठला नसल्याचे दिसून येते. २०११ वर्षांत मालवाहतुकीपासून ४३१ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर मागील २०१२  वर्षांत हे उत्पन्न केवळ सात कोटींनी (एक टक्का) वाढू शकले. मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मिळून २०११ साली एकूण ६१० कोटींचे उत्पन्न मिळाले होते. नंतरच्या २०१२ वर्षांत ६६६ कोटी  एवढे उत्पन्न मिळाले. सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
उत्पन्नाचा तपशील सांगताना ते म्हणाले, २०११ वर्षांत प्रवासी तिकीट तपासणीच्या माध्यमातून सापडलेल्या फुकटय़ा प्रवाशांकडून मिळालेले उत्पन्न ८ कोटी ४० लाखांचे होते. तर २०१२ वर्षांत हे उत्पन्न १० कोटी ९४ लाखांपर्यंत (३० टक्के) वाढले. तर पार्सल विभागाच्या माध्यमातून २०११ साली जेमतेम एक कोटी ६५ लाखांचे उत्पन्न लाभले होते. परंतु २०१२ साली त्यात लक्षणीय म्हणजे तब्बल ५१४ टक्के वाढ होऊन १० कोटी १८ लाखांचा महसूल जमा झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. महसूल वाढीत दूध वाहतुकीचा हातभार महत्त्वाचा आहे. दौंड ते नवी दिल्ली मिल्क एक्स्प्रेसच्या ४३ फेऱ्या झाल्या. त्यातून पाच कोटी २५ लाखांच्या उत्पन्नाची रेल्वेच्या तिजोरीत भर पडली. मिल्क एक्स्प्रेसची सेवा अद्याप सुरू असून त्यास उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. राष्ट्रीय स्तरावर सोलापूर विभागाचा खर्चाचा आढावा घेतला असता २०११ वर्षांत खर्चाचे प्रमाण एक रुपयाच्या उत्पन्नामागे ८८ पैसे याप्रमाणे होते, तर हे प्रमाण मागील २०१२ वर्षांत कमी होऊन एक रुपये उत्पन्नामागे ६०पैसे एवढे झाल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.