हैदराबाद रस्त्यावर शहरानजीक बोरामणी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला ६२ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याशिवाय आणखी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळावर यापूर्वी सोलापूर-मुंबई-सोलापूर विमानसेवा सुरू होती. त्यास प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला असतानासुद्धा केवळ शह-काटशहाच्या राजकारणामुळे ही विमानसेवा अचानक बंद करण्यात आली. प्राप्त परिस्थितीत या जुन्या विमानतळावर सर्व अद्ययावत सोयीसुविधा तथा तांत्रिक बाबींची पूर्तता कायम असल्याने विमानसेवा पुन्हा सुरू होऊ शकते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असून उलट या जुन्या विमानतळाच्या संपूर्ण जागेवर डोळा ठेवून हे विमानतळ कायमचे निकाली काढण्याचा घाट घातला जात आहे.
या पाश्र्वभूमीवर बोरामणीच्या कार्गो विमानतळाच्या उभारणीसाठी चालू आíथक वर्षांत ७ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन व जनसंपर्क राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने यांना पत्रान्वये कळविले आहे. या विमानतळासाठी राज्य सरकारने आतापर्यंत ५९ कोटी ५० लाखांचा निधी दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. बोरामणी विमानतळाचे क्षेत्रफळ ६७२ हेक्टर एवढे आहे. परंतु पुरेशा निधीअभावी विमानतळ उभारणीचे काम रखडले आहे. विमानतळाभोवती संरक्षक कुंपण घालण्याचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, बोरामणी विमानतळ पूर्ण होण्यास आणखी बऱ्याच कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे हे नवे विमानतळ सुरू होईपर्यंत होटगी रोड विमानतळाची सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा