दारूचे व्यसन सोडून कामधंदा करून संसारासाठी हातभार लावण्याची विनवणी करणाऱ्या आपल्या पत्नीचा जाळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात सुहास उत्तम कारंडे (रा. सासुरे, ता. बार्शी) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सदोष मनुष्यवधाबद्दल सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी सुहास कारंडे याने मृत सारिका (वय २०) हिच्याबरोबर दुसरा विवाह केला होता. त्याची पहिली पत्नी जळीतकांडात मृत्युमुखी पडली होती. सुहास यास दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो काहीही कामधंदा न करता सतत दारूच्या नशेत घरात त्रास देत असे. त्यामुळे पत्नी सारिका हिने पतीला दारू पिऊ नका, कामधंदा करा व संसारात मदत करा, अशी विनवणी केली. त्यामुळे चिडून सुहास याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. नंतर ती मरण पावली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी सात साक्षीदार तपासले. यात मृत्युपूर्व जबाब घेणारे कार्यकारी दंडाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मृत्युपूर्व जबाब ग्राहय़ धरून न्यायालयाने आरोपीला दोषी धरताना खुनाच्या आरोप सिद्ध न झाल्याने सदोष मनुष्यवधाच्या गुन्हय़ाबद्दल आरोपीला दोषी धरले. आरोपीतर्फे अ‍ॅड. आर. आर. पाटील यांनी बचाव केला.

Story img Loader