येत्या जुलैअखेर पाणीपुरवठय़ाच्या टँकरच्या संख्येत तिपटीने वाढ, तर त्यासाठीचा खर्च दुप्पट होईल. जुलैअखेर ३ हजार ७९१ टँकर लागतील. सध्या १ हजार १५३ टँकरवर ३३ कोटी रुपये खर्च झाले असून पुढच्या तीन महिन्यांत त्यात दुपटीने वाढ होईल. तो खर्च ७० कोटींच्या घरात असेल, अशी सरकारी आकडेवारी सांगते.
पाणीटंचाई किती भीषण रूप धारण करेल, याचा अंदाज आता जवळपास रोज घेतला जात आहे. कोणत्या भागात किती पाणीसाठी शिल्लक आहे? एक पाण्याचा स्रोत आटल्यानंतर दुसरा कोठे उपलब्ध असेल, याचे नियोजन गेल्या मार्चपासून केले जात आहे. एक-एक स्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे टँकरच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. पाणीटंचाईची तीव्रता जून-जुलैमध्ये अधिक जाणवेल, असे अधिकारी आवर्जून सांगतात. जून व जुलै या महिन्यांत सरासरी पाऊसमान झाले तरी धरणांच्या पाणीपातळीत वाढ होणे शक्य नाही. त्यामुळे मराठवाडय़ात ३ हजार ७९१ टँकर लागण्याची शक्यता आहे. प्रतिकिलोमीटर टँकरचा दरही वाढवून मिळावा, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. जुलैअखेर औरंगाबाद जिल्ह्य़ात ४०७ टँकर लागतील, असा अंदाज आहे.
सर्वाधिक दुष्काळी समजल्या जाणाऱ्या एकटय़ा जालना जिल्ह्य़ात १ हजार ६८५ टँकर लागतील. परभणीत ६७, हिंगोलीत ७६, नांदेडमध्ये ३५०, बीड ४३५, लातूर १३१, तर उस्मानाबादमध्ये ६४० टँकर लागू शकतील. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी उजनी पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते. या योजनेतून शहराला पाणीपुरवठा झाला तर या जिल्ह्य़ातील टँकरची संख्या काही प्रमाणात घटेल. अन्यथा मराठवाडय़ात बहुतांश गावांना टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, जेथे टँकर नाही, अशा जिल्ह्य़ांमध्ये नादुरुस्त टँकरऐवजी नवीन टँकर घेण्याच्या प्रस्तावांनाही मान्यता दिली जात आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी नवे टँकर घेण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, अन्य जिल्ह्य़ांतून टँकर खरेदीच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. जिल्हा वार्षिक योजनेच्या १५ टक्के रक्कम दुष्काळ निवारणासाठी खर्च करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असल्याने या निधीतून नवीन टँकर घेण्यास मंजुरी देता येऊ शकेल. मराठवाडय़ातील टँकरची संख्या पुढील तीन महिन्यांत तिपटीने वाढणार आहे.