सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७० लाखांच्या घरात गेली असून आगामी लोकसभा तसेच विधान सभा निवडणुकांमध्ये या मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्य़ात एक कोटी १० लाख लोकसंख्येची नोंद झाली असून आता जिल्ह्य़ाची लोकसंख्या सव्वा कोटीपर्यंत गेली असल्याचा अंदाज आहे.
राज्यातील विधानसभा मतदारसंघ आणि मतदारसंख्येच्या जवळपास दहा टक्के वाटा एकटय़ा ठाणे जिल्ह्य़ाचा आहे. ठाणे जिल्ह्य़ात एकूण २४ विधानसभा मतदारसंघ असून चार लोकसभा मतदारसंघ आहेत. अलीकडेच जिल्ह्य़ातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले. त्यानुसार जिल्ह्य़ातील मृत, दुबार तसेच स्थलांतरित अशी एकूण दोन लाख दहा हजार मतदारांची नावे वगळण्यात आली. नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्य़ातून सहा लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज आले होते. त्यापैकी ४ लाख ८० हजार मतदारांची नोंदणी झाली असून जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७० लाखांच्या घरात गेली आहे. सर्वाधिक म्हणजे तीन लाख साठ हजार मतदार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहेत. मतदारांच्या प्रमाणानुसार डहाणू सर्वात लहान मतदारसंघ ठरणार असून तिथे २ लाख २६ हजार मतदार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  
७५ टक्के मतदारांना ओळखपत्रे
मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य केले जाण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्य़ात ओळखपत्र देण्याची मोहीमही राबविण्यात आली होती. ५० हजार मतदारांनी त्याचा लाभ घेतला. आता जिल्ह्य़ातील एकूण ७५ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader