विदर्भात गेल्या दशकभरात पीक रचनेत प्रचंड बदल झाले असतानाच यंदा मान्सूनच्या विलंबाने मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. विदर्भात आतापर्यंत ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अमरावती विभागात ८३ टक्के तर नागपूर विभागात ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
नागपूर विभागात सर्वाधिक ४ लाख, २५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली असून त्या खालोखाल २ लाख, ४७ हजार हेक्टर क्षेत्रात धान तर २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे नागपूर जिल्ह्य़ासह संपूर्ण विदर्भातच कोरडय़ा दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. परंतु तब्बल एका महिन्यानंतर पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नागपूर जिल्ह्य़ात ८२ टक्के पेरण्या झाल्या. यावर्षी नागपूर जिल्ह्य़ात ४४५.३ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तलावातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्य़ात खरीप हंगामाचे ४ लाख ८३ हजार ३६० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
जिल्ह्य़ात कापूस, सोयाबीन, तूर व धान ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. यामध्ये कापसाची पेरणी १ लाख ८० हजार हेक्टर आणि सोयाबीनची पेरणी १ लाख ३० हजार हेक्टरमध्ये झाली आहे. उर्वरित क्षेत्रात भूईमूग, बरबटी, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात धानाची रोवणी सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी दिली.
अमरावती विभागात ८३ टक्के पेरण्या आटोपल्या असून सर्वाधिक १२ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. पश्चिम विदर्भात गेल्या दहा वर्षांत सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र तब्बल ८ लाख हेक्टरने वाढले तर, कपाशीच्या क्षेत्रात ४ लाख हेक्टरची घट झाली आहे. या उलथापालथीचा प्रभाव ज्वारी, तीळ यासारख्या पिकांवर पडला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही सोयाबीनने अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. सोयाबीनच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र १० लाख ९८ हजार हेक्टर आहे, त्यापेक्षा जास्त म्हणजे १२ लाख ९८ हजार हेक्टरमध्ये (११८ टक्के) सोयाबीनचा पेरा झाला आहे. कपाशीचे सरासरी क्षेत्र १० लाख ७८ हजार हेक्टर असताना आतापर्यंत ८ लाख ९९ हजार हेक्टरमध्येच (८३ टक्के) कपाशीचा पेरा आटोपला आहे.
मुगाचे क्षेत्र दशकभरात २ लाख ८८ हजार हेक्टरहून २ लाख ५ हजारावर आले आहे. उडीदही १ लाख ८० हजार हेक्टरच्या तुलनेत १ लाख १० हजारापर्यंत कमी झाले आहे. तेलबियांच्या बाबतीत सूर्यफूल, भुईमूग आणि तिळाच्या लागवडीत पश्चिम विदर्भ अग्रेसर होता, पण सोयाबीनच्या लाटेत ही पिके झाकाळून गेली आहेत. विभागात तिळाचे सरासरी क्षेत्र ३२ हजार हेक्टर होते, ते आता फक्त ९ हजार हेक्टर उरले आहे. सूर्यफुलाच्या क्षेत्रात ४०० हेक्टरची किंचित घट झाली आहे. या सर्व पिकांची जागा सोयाबीनने घेतली आहे.आतापर्यंत अमरावती विभागात १० हजार हेक्टरमध्ये भाताची रोवणी झाली आहे. ज्वारीच्या सरासरी लागवडीखालील २ लाख ९० हजार हेक्टरच्या तुलनेत केवळ ६८ हजार हेक्टर म्हणजे २३ टक्केच क्षेत्र ज्वारी पिकाखाली आले आहे.
३० हजार हेक्टरमध्ये मका लागवड झाली आहे. तुरीच्या सरासरी ३ लाख ८२ हजार हेक्टरपैकी ३ लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ७९ टक्के क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. उडिदाच्या सरासरी १ लाख १० हजार हेक्टरपैकी २४ हजार हेक्टरमध्ये (२२ टक्के) क्षेत्रात उडीद आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ५६ हजार हेक्टरमध्ये (२७ टक्के) मूग आहे. मान्सून विलंबाने आल्याने मूग आणि उडिदाचा पेरा कमी झाला आहे.
विदर्भात ७० टक्के पेरण्या आटोपल्या
विदर्भात गेल्या दशकभरात पीक रचनेत प्रचंड बदल झाले असतानाच यंदा मान्सूनच्या विलंबाने मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. विदर्भात आतापर्यंत ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अमरावती विभागात ८३ टक्के तर नागपूर विभागात ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
First published on: 06-08-2014 at 08:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 percent crop sowing completed in vidarbha