बेपत्ता व्यक्ती सुस्थितीत सापडणे कठीण झाले असल्याचे राज्यातील अलीकडच्या काही घटनांमुळे स्पष्ट झाले असून पोलीस बेफिकीर तर नाहीत ना, अशी शंका त्यामुळे निर्माण झाली आहे.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह येवत येथील कालव्यात सापडल्याची घटना अगदी ताजी आहे. कुणी बेपत्ता झाल्यास तशी नोंद पोलीस ठाण्यात करणे अत्यावश्यकच आहे. मात्र, अपवाद वगळल्यास बेपत्ता झालेली व्यक्ती सुस्थितीत सापडणे कठीण झाले असून त्यांचे मृतदेहच सापडले असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गरिबी, तसेच विविध कारणांमुळे मुलगे अथवा तरुण घराबाहेर पडतात. कुणी आत्महत्या करतात, तर कुणी गुन्हेगारीत अडकतात. अनेकजण बेवारसपणे राहतात, असे आढळून आले आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.
नागपूर शहरात २०१२ ते ३१ डिसेंबर २०१४ या काळात बेपत्ता झालेल्यांपैकी अद्यापही ६७ मुलगे, १७९ मुली, ६५४ पुरुष व ५६६ महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. २०१४ मध्ये सर्वाधिक मुली (८४) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, त्याखालोखाल ४० कळमना, गिट्टीखदान (३१), सर्वाधिक मुलगे (२४) गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, तर त्याखालोखाल नंदनवन १५, सर्वाधिक पुरुष (९२) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, त्याखालोखाल ६७ गिट्टीखदान, तर ५२ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेले आहेत. यांचा शोध न लागण्यामागे अपुरे मनुष्यबळ हे प्रमुख कारण सांगितले जाते. बेपत्ता व्यक्ती सापडल्यानंतर त्यासंबंधी पोलिसांना कळविले जात नाही. तरुण-तरुणी परस्पर लग्न करून राहतात. विशेषत: मुली अथवा महिला पळून जाऊनही लग्न करतात. त्याची माहिती मात्र पोलिसांना नसते.
मुंबईत पोलिसांचे मुबलक मनुष्यबळ आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास किमान दोन शिपाई असतात. राज्याच्या इतर भागात अशी स्थिती नाही. बंदोबस्त, गस्त व इतर गुन्ह्य़ांचा तपास असतोच. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा