परभणी महापालिका हद्दीतील शिवाजी पुतळा ते दत्तधाम या राष्ट्रीय महामार्गावरील ७१ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. वाहतुकीवर परिणाम होत असल्याने ही झाडे तोडण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर राजगोपालाचारी उद्यानाचे भाग्य उजळणार असून, उद्यानात खासगी तत्त्वावर रेल्वे गाडी सुरू करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
बी. रघुनाथ सभागृहात जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक शनिवारी सायंकाळी झाली. बैठकीस उपायुक्त दीपक पुजारी, नगरसचिव चंद्रकांत पवार, समितीचे प्रमुख सय्यद इमरान, नगरसेविका अश्विनी वाकोडकर, सचिव अंबिलवादे, बाळासाहेब बुलबुले, सय्यद समी, सुनील देशमुख, नवनीत पाचपोर, नदीम इनामदार आदी उपस्थित होते. शहरातील महापालिकेच्या जागेवर असणाऱ्या जुनाट आणि अडचण ठरणारी झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा ठराव मांडण्यात आला. राजगोपालाचारी उद्यानातील लिंबाचे झाड, पंचायत समितीसमोरील गुलमोहोर झाड, पोलीस अधीक्षक कार्यालयालगत असलेले गुलमोहोर, जुन्या नगर परिषद इमारत परिसरात शिरसेचे झाड तोडण्यास परवानगी मिळाली. ही झाडे तोडण्याअगोदर तेथे नवीन झाडे लावण्यास बंधनकारक केले आहे. झाडे तोडताना त्याच्या दुप्पट झाडे लावावी लागणार आहेत. शिवाजी पुतळा ते दत्तधाम या महामार्गावरील ७१ झाडे वाहतुकीस अडथळा आणत आहे. त्यामुळे ही झाडे तोडून झाडाच्या विक्रीनंतर आलेले पैसे वृक्ष खात्यात टाकावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर राजगोपालाचारी उद्यानाचे खासगीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या उद्यानात आता रेल्वेगाडीसह इतर लहान मुलांची खेळणी बसवून त्याचे नियंत्रण खासगी तत्त्वावर देण्यात येणार आहे. या कामाची निविदा काढून उद्यानाला प्रवेश शुल्क लावावे, अशी सूचना सिंह यांनी केली. शहरातील शाळा महाविद्यालयांनी वृक्षलागवड केल्यास त्या महाविद्यालयाचा सन्मान करून तसेच शहरात हरितक्रांतीसाठी नवीन ३० लाख झाडे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरात नवीन झाडे लावताना संरक्षक जाळी लावण्यात येणार आहेत. झाड तोडण्यापूर्वी झाडाची पाहणी करूनच ते तोडावे लागणार आहे.

Story img Loader