प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक पाऊले टाकली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, दीड वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून रेल्वे सुरक्षा दलात शुक्रवारी समाविष्ट झालेली ७२ महिला कॉन्स्टेबलची नवीन तुकडी. रेल्वे सुरक्षा दलात एकूण जागांपैकी १० टक्के जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्याचा जो निर्णय नुकताच घेण्यात आला, त्याची अंमलबजावणी या निमित्ताने सुरू झाल्याचे दिसत आहे. महिलांची ही संपूर्ण तुकडी मध्यरेल्वेच्या सेवेत दाखल झाली आहे.
उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाडय़ांमध्ये महिलांसाठी राखीव डबा समाविष्ट असला तरी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ते महिला पोलिसांचे पुरेसे बळ उपलब्ध नव्हते. परिणामी, महिला प्रवाशांना प्रवासात सुरक्षिततेची हमी मिळेलच, याची खात्री नसायची. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमध्ये कधीकधी बलात्काराचेही प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. उपनगरीसह अन्य गाडय़ांमध्ये महिलांची केली जाणारी छेडछाड, ही तर नित्याची समस्या. रात्रीच्यावेळी महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या एकूणच पाश्र्वभूमीवर, महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सुरक्षा दलात महिला

पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे सुतोवाच केले आहे. त्यांची ही घोषणा नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या चवथ्या दीक्षांत सोहळ्यात खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आल्याचे पहावयास मिळाले. या तुकडीत ७२ महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. मध्यरेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या तुकडीच्या दीक्षांत संचलनाचे आयोजन करण्यात आले.
रेल्वे प्रवासी व त्यांच्या सामानाची सुरक्षितता आणि स्थानकावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षणही या विभागाला करावे लागते. रेल्वे प्रवास व स्थानकांवर घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही कमी नाही. या गुन्ह्यांची उकल करण्याचे कामही या दलास करावे लागते. महिला कॉन्टेबलच्या तुकडीस या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. दीड वर्षांच्या कालावधीत गुन्ह्यांची उकल करणे, सशस्त्र प्रशिक्षण, कोम्बॅक्ट, ज्युडो, स्वसंरक्षण आदींचे शिक्षण या महिलांना देण्यात आले. ही तुकडी मध्यरेल्वेच्या सेवेत दाखल होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.