गोंदिया जिल्ह्य़ात या महिन्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा ७४८ कुटुंबांना तडाखा बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसनासाठी अप्पर सचिव महसूल व वनविभाग यांना दिलेल्या आकडेवारीत १८ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येते, परंतु प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अनेकांना नुकसान-भरपाईपासून मुकावे लागणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
या जिल्ह्य़ात एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यास आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांसह अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. या वादळाचा तडाखा प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव, गोंदिया व आमगाव तालुक्यातील हजारो नागरिकांना बसल्याचे जिल्हा प्रशासनातील आकडेवारीवरून दिसून येते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत व पुनवर्सनासाठी अप्पर सचिव महसूल व वनविभागाला दिलेल्या नुकसानभरपाईच्या अहवालानुसार एकूण ७४८ कुटुंबांना वादळी पावसाचा तडाखा बसल्याचे सांगण्यात आले आहे व १८ लाख ५३ हजार ८०९ रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाची आकडेवारी दर्शवीत आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून तालुक्यातील २० गावातील ७२९ कुटुंबांचे १७ लाख ४९ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालानुसार दिसत आहे. यात होकरी, जरूघाटा, पुष्पनगर, चिचोली, वडेगाव-बंध्या, तुकुमनारायण, केळवद, उमरपायली, वारवी, डोंगरगाव, गोठनगाव, वडेगाव, इटखेडा, ईसापूर, खामखुर्रा, कोरंभी, येगाव, जानवा, मालकनपूर, माहुरकुडा या गावांचा समावेश आहे.
त्या पाठोपाठ १३ एप्रिल रोजी आलेल्या वादळी पावसात गोंदिया तालुक्यातील चार गावातील १८ कुटुंबांचे ८० हजार २०० रुपयांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. यात पांढराबोडी, खातीटोला, रतनारा, सईटोला या गावांचा, तर आमगाव तालुक्यातील भजेपार येथील एका कुटुंबांचे २४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंडळ अधिकारी व तलाठय़ांना नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अद्यापही कार्य सुरूच आहे, परंतु तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी व प्रत्यक्षात झालेले नुकसान यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात शेकडो घरांची पडझड झाली, तर उन्हाळी धान, टरबूज, आंबा यासारखी पिके व फळांचेही मोठे नुकसान झाले, परंतु जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात केवळ १८ लाख ५३ हजार ८०९ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अप्पर सचिवांना देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या प्राथमिक आकडेवारीमुळे अनेक आपादग्रस्तांवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातील या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. काही घरांची अवस्थाही राहण्यायोग्य नसल्याचे दिसून येत आहे.
अशा वेळी मंडळ अधिकारी व तलाठय़ांनी नुकसानीचा योग्य आढावा घेणे गरजेचे आहे, परंतु प्रशासनातील कागदी घोडे नाचविण्याच्या शैलीमुळे शासन वास्तविकतेपासून अनभिज्ञ आहे. त्यामुळे प्रशासनाने आपली जवाबदारी ओळखून उदासीन भूमिका बाजूला सारून अंतिम नुकसानीची आकडेवारी देतांना जनसामान्यांचे हित जोपासणे गरजेचे आहे.