तुम्ही कोणत्या प्रकारचे सामाजिक कार्य करता? तुमच्या मतदारसंघाची अथवा वॉर्डाची रचना कशी आहे? जनसंपर्क कोणत्या आधारावर आहे? उत्तर देण्यास वेळही न देता एकापाठोपाठ एक अशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होत असल्यामुळे इच्छुक उमेदवार गांगरून जात आहेत. धुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे घेतलेल्या  इच्छुकांच्या मुलाखतीत हे चित्र पाहावयास मिळाले. प्रत्येकाला एकसारखेच प्रश्न विचारताना उत्तर देण्यास इच्छुकांना कमी कालावधी मिळाला. कारण, अवघ्या तीन तासांत राष्ट्रवादी काँग्रेसने ७४८ तर काँग्रेसने ६१४ इच्छुकांच्या वायुगतीने मुलाखती घेत हा सोपस्कार पार पाडला. शिवाय, या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर िरगणात उतरणार असल्याचे संकेतही दिले.
जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि ११२ गणांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याच वेळी धुळे महानगरपालिकेच्या ३५ प्रभागांमधील ७० वॉर्डातील निवडणुकाही होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकाच दिवशी स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने शहरातील उभय पक्षांच्या कार्यालय परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. काँग्रेसचे निरीक्षक म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रभारी अ‍ॅड. ललिता पटेल, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या.
काँग्रेसतर्फे महापालिकेच्या ७० वॉर्डासाठी ३५० इच्छुकांनी तर जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी १२६ व पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी २३७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती निरीक्षक नाना महाले यांनी घेतल्या. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे शहर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव परदेशी, जिल्हा सरचिटणीस सुनील वाघ उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी झाली असताना मुलाखतीची ही प्रक्रिया जलदगतीने पार पडली.
इच्छुकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेतल्यास ते फारसे वेगळे नव्हते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांनी मुलाखतीचा फार्स केल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे. मुलाखतीसाठी आतमध्ये गेलेला इच्छुक एक ते दोन मिनिटांत बाहेर पडत होता.
अवघ्या काही मिनिटांच्या परीक्षेत पक्ष उमेदवारांची क्षमता कशी जोखणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्येक गट वा गणात कोणाला उमेदवारी द्यायची हे स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी आधीच ठरवले आहे. त्याची यादी पक्षाकडे सोपविली गेल्याचे सांगितले जात असून मुलाखतीद्वारे केवळ सर्वाचे समाधान करण्यावर भर राहिल्याची अनेक इच्छुकांची भावना आहे. यामुळेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीन ते चार तासांत तब्बल एक हजार ३६२ इच्छुकांच्या मुलाखती घेऊन या विषयावर पडदा टाकला आहे.
इच्छुकांची संख्या मोठी असली तरी प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नसते. यामुळे रुसवे-फुसवे स्वत:वर लादून घेण्यापेक्षा मुलाखत घेण्यासाठी येणाऱ्या नेत्यांवर निर्णय सोपवून पक्ष नेते आपला उमेदवार देण्यात यशस्वी होतात, हीच आजवरची परंपरा आहे.
यंदाच्या निवडणुकीत फारसे काही घडेल अशी अपेक्षा नसली तरी इच्छुकांचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा म्हणता येईल.

Story img Loader