मोनो रेल्वेच्या कानामागून येऊन तिखट झालेल्या मेट्रोला मुंबईकरांनी भलतीच पसंती दिली असून ८ जूनपासून २८ जूनपर्यंत २० दिवसांतच तब्बल ७५ लाख मुंबईकरांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. वर्सोवा ते घाटकोपर हा ११.४ किलोमीटरचा प्रवास दीड तासांवरून २१ मिनिटांवर आणणाऱ्या या मेट्रोची दर दिवसाची प्रवासी संख्याच पाच लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अल्पावधीतच मेट्रोला आपल्या व्यग्र जीवनाचा भाग बनवल्याची पावतीच मेट्रोला मिळाली आहे. मात्र या भरगच्च प्रतिसादाला १० रुपयांचे स्वागतमूल्य कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. ९ जुलैपासून मेट्रोचीही दरवाढ होणार असून त्यानंतर खरा प्रतिसाद लक्षात येणार आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारपासून मुंबईकराच्या सेवेत आलेल्या मेट्रोने पहिल्याच दिवशी २.४० लाख प्रवाशांना ११ तासांत सेवा दिली होती. दुसऱ्या दिवसापासून मेट्रो दिवसातील साडेअठरा तास सुरू झाली आणि मेट्रोच्या प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ होऊ लागली. दुसऱ्या दिवशी २.९२ आणि तिसऱ्या दिवशी २.९७ लाख प्रवाशांनी मेट्रोचा लाभ घेतला. विशेष म्हणजे त्यानंतर गेले २० दिवस प्रवाशांचा प्रतिसाद कायम असून आता मेट्रोने दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आता मेट्रोचे प्रतिदिन प्रवासी भारमान ४.५ लाखांच्या पुढे पोहोचले आहे.
गेल्या २० दिवसांमध्ये मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७५ लाख एवढी असल्याचे सांगण्यात आले. सध्या मेट्रोचे तिकीट सरसकट १० रुपये असल्याने २० दिवसांतच मेट्रोने ७.५ कोटी रुपये कमाई केली आहे. मात्र ९ जुलैपासून मेट्रोचे तिकीट १० ते ४० रुपये होणार आहे. त्यानंतर मेट्रोला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे. पण मेट्रो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार साकीनाका, मरोळ, वर्सोवा अशा ठिकाणी काम करणाऱ्या अनेक जणांच्या वेळेची बचत मेट्रोमुळे होत आहे. आता मेट्रो मुंबईकरांच्या सवयीचा भाग बनली असल्याने दैनंदिन प्रवासी संख्या फार कमी होणार नाही.

Story img Loader