जिल्ह्य़ातील कुप्पा येथे शेतातील कोरडय़ा २५० फूट खोल व बंद असलेल्या कूपनलिकेत बुधवारी दुपारी ७५ वर्षांचा वृद्ध पडला. सुमारे ३० फूट खोल नलिकेत तो अडकला.
या वृद्धाला वाचविण्यास जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली असून, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधीक्षक सदाशिव मंडलिक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मागील आठ तासांत प्रशासनाने २३ फुटांपर्यंत कूपनलिकेच्या बाजूने खोदकाम करून वृद्धाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. कूपनलिकेत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे.
वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजाभाऊ काळे यांचे परळी-बीड रस्त्यापासून अध्र्या किलोमीटर अंतरावर शेत आहे. या शेतात या वर्षी कूपनलिका घेतली होती. मात्र, अडीचशे फूट खोल खोदूनही पाणी न लागल्यामुळे पाइप काढून कूपनलिकेवर काही तुराटया व टोपल्याने झाकून ठेवले होते. काळे यांच्या शेतावर काम करणारे माणिक रत्नाकर वायगळ (वय ७५) बुधवारी दुपारी एकच्या सुमारास कूपनलिकेवरील टोपले घेऊन येण्यास गेले. टोपले घेतल्यानंतर अचानक पाय घसरून ते कूपनलिकेत पडले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेतावरील लोक धावले. त्यांनी सोल टाकून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हालचाल होताच ते आणखी खाली गेले. मात्र, अंदाजे ३० फुटांवर ते अडकून पडले. त्यांच्या ओरडण्याचा व बोलण्याचा आवाज बाहेर येत असून या बाबतची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली. प्रशासनाने तत्काळ बचाव अभियान सुरू केले. दोन जेसीबी, ट्रॅक्टरसह अधिकारी दाखल झाले. स्थितीचा अंदाज घेत कूपनलिकेच्या बाजूने खोदकाम सुरू केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे दुपारीच घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी जिल्हाधिकारी केंद्रेकर घटनास्थळी गेले.
सायंकाळी सातपर्यंत सुमारे २३-२४ फुटांपर्यंत खोदकाम झाले होते, असे सूत्रांनी सागितले. आणखी काही तास खोदकाम झाल्यावर वृद्धाला बाहेर काढले जाईल, असा विश्वास टाकसाळे यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा